सिन्नर : तालुक्यातील मोह गावाजवळील शिवारात रविवारी (दि.२) एका तीस वर्षीय विवाहितेने आपल्या दोन मुलांसह येथील पाझर तलावात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, याप्रकरणी मृत विवाहितेच्या भावाच्या फिर्यादीवरून तिचा पती, सासू-सासरे, दीर व जाऊ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पती व सासू-सासऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
ज्योती विलास होलगीर (३०), गौरी विलास होलगीर (१०), साई विलास होलगीर (८) अशी मृतांची नावे आहे. हे सर्व मोह शिवारात राहत होते. दरम्यान, मृत विवाहिता व मुले हे शनिवारी दुपारच्या सुमारास राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार तिचे सासरे पांडुरंग होलगीर यांनी सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात केली होती. पण रविवारी (दि. २) सकाळी नऊच्या सुमारास होलगीर वस्तीजवळ असलेल्या पाझर तलावाच्या पाण्यावर या तिघांचेही मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले.
याची माहिती सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्याला मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, सहाय्यक निरीक्षक तुषार गरुड, संदेश पवार, उपनिरीक्षक रावसाहेब त्रिभुवन, हवालदार मनीष मानकर, प्रशांत वाघ, शशिकांत निकम, रोशन गायकवाड, प्रकाश उंबरकर, बाळासाहेब सानप यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. व तेथील स्थानिक युवकांच्या मदतीने त्या तिघांना पाण्याबाहेर काढत त्वरित सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी या तिघांनाही मृत घोषित केले.
दरम्यान, मृत ज्योतीचा भाऊ सुनील चिंधु सदगीर (रा. हिसवळ ता. नांदगाव) याने पोलीस ठाण्यात येत आपल्या बहिणीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याची तक्रार केली आहे. पती विलास होलगीर, सासरे पांडुरंग होलगीर, सासू फशाबाई होलगीर, दीर अमोल व जाऊ सुनीता यांच्याकडून आपल्या बहिणीला माहेरून पैसे आणण्यासाठी सतत मारहाण करत असे. तसे त्या लोकांनी अनेकदा तिचा शारीरिक व मानसिक छळ केला आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून माझ्या बहिणीने भाच्यांसह आत्महत्या केल्याचे मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेत त्याची त्वरित प्राथमिक चौकशी केली. याप्रकरणी मृत विवाहितेचा पती विलास, सासरे पांडुरंग व सासू फशाबाई या तिघांना अटक केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम