Skip to content

शांताराम तात्या आहेर हे स्वतंत्र विचारविश्व असणारे जहाल व अभ्यासू व्यक्तिमत्व


देवळा : शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी झटणारे, शेती-मातीच्या माणसांशी बांधिलकी जोडणारे, स्वतत्वांना कधीही मुरड न घालता स्वतंत्र विचारविश्व असणारे जहाल व अभ्यासू व्यक्तिमत्व असणाऱ्या शांतारामतात्या आहेर यांच्याबद्दल अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली. रविवार (दि.२३) रोजी देवळा महाविद्यालयाच्या सभागृहात माजी आमदार शांतारामतात्या आहेर यांच्या नुकत्याच झालेल्या निधनाबद्दल शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी वक्ते बोलत होते.

देवळा : येथील महाविद्यालयाच्या सभागृहात माजी आमदार (स्व.) शांतारामतात्या आहेर यांच्या शोकसभेसाठी उपस्थित मान्यवर (छाया – सोमनाथ जगताप )

योगेशआबा आहेर मित्रमंडळ व शेतकरी परिवाराच्या वतीने सदर शोकसभा घेण्यात आली. तात्यांचा सहवास, अनुभव, मार्गदर्शन, सल्ला, आठवणीं व घटनांचा दाखला देत अनेकांनी जुन्या राजकीय व सामाजिक घटनांना उजाळा दिला. यावेळी अनेकांना अश्रू अनावर आले. माजी पंचायत समिती सदस्या व सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा आहेर यांनी तत्कालीन शेतकरी संघटना, शरद जोशी आणि त्यांना खंबीर साथ देणारे शांतारामतात्या आहेर याबाबत मनोगत व्यक्त करत कवितावाचन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष यशवंत शिरसाठ यांनी ‘राजकारणातील बापमाणूस’ अशी उपाधी देत तत्वांप्रमाणे विचार आणि आचार ठेवणारा नेता म्हणून त्यांचे वर्णन केले. ज्येष्ठ नेते पंडितराव निकम यांनीही ‘मी पाहिलेले तात्या’ याबाबत विविध घटना आणि प्रसंग सांगत (कै.)आहेर यांचे कार्य प्रतिपादित केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मनमाडचे शहराध्यक्ष दीपक गोगड यांनी चारित्र्य जपत मार्गदर्शकाच्या भूमिकेत भावलेले आणि कर्तृत्वाचे महामेरू असलेल्या तात्यांना आदरांजली वाहिली. कळवण वकील संघाचे अध्यक्ष नानासाहेब पगार, दिप सोनवणे ,काँगेसचे तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, डॉ.एकनाथ पगार आदींनी आपले मनोगते व्यक्त केले. शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख शशिकांत भदाणे यांनी जुन्या काळातील संघटनेच्या स्मृती जाग्या केल्या. खालपचे अविनाश सूर्यवंशी, दलित मित्र भा.ता.आहिरे, उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील आहेर यांनी तात्यांबद्दलचे अनुभव सांगत कार्यकर्तृत्व विशद केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी वसाका कारखान्यातील चेअरमन पदाची यशस्वी कारकीर्द यावर प्रकाशझोत टाकला.

जिल्हा परिषदेच्या माजी समाजकल्याण सभापती उषा बच्छाव यांनी आपला राजकारणातील प्रवेश, त्यास तात्यांनी दिलेला पाठिंबा आणि त्यातून केलेली जनसेवा या अनुषंगाने मिळालेली तात्यांची साथ नमूद करत कृतज्ञता व्यक्त केली. मोठाभाऊ पगार यांनी पत्रकारांच्या नजरेतील तात्या याबद्दल सांगितले तर डॉ.राजेंद्र ब्राम्हणकार व मविप्रचे माजी संचालक डॉ.व्ही.एम.निकम यांनी शांतारामतात्या आहेर यांचे राजकारण, त्यांचे संघटन, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून केलेली आंदोलने, दिलेले लढे, आदर्श लोकप्रतिनिधी यावर विवेचन करत त्यांच्या विचारांचा व कार्याचा आदर्श पुढे नेण्याचे आवाहन केले.

यावेळी किशोर कदम, ज.ल.पाटील, महारोजगार केंद्राचे भाऊसाहेब पगार, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष जगदीश पवार, शहराध्यक्ष दिलीप पाटील, अतुल आहेर ,जितेंद्र आव्हाड युवा मंचचे जिल्हाध्यक्ष सचिन सूर्यवंशी, नगरसेवक संतोष शिंदे, मुख्याध्यापक दिलीप आहेर,वसाकाचे माजी संचालक आनंदा देवरे, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष माणिक निकम, ऍड.सुभाष शिंदे, डॉ.सतीश ठाकरे, डॉ.राम अहिरराव , देमोकोचे संचालक योगेश वाघमारे ,प्रदीप आहेर आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. सुनील आहेर यांनी सूत्रसंचालन केले. पसायदानाने शोकसभेची सांगता करण्यात आली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!