नाशिक : जिल्हा प्रशासनाने घातलेल्या बंदीनंतर अखेर न्यायालयाच्या अटी-शर्तींची पूर्तता करून काल (दि. ५) भाविकांच्या उपस्थितीत वणी येथील सप्तश्रृंगीगडावर बोकड बळीचा विधी मोठ्या उत्साहात पार पडला.
२०१७ मध्ये जिल्हा प्रशासनाने बोकड बळी प्रथेवर बंदी घातली होती. त्यानंतर स्थानिक आदिवासी बांधव व सप्तश्रृंगीगड व अन्य गावांतील अनेक ग्रामस्थ व भाविकांनी ५ वर्षे न्यायालयीन लढा दिला होता. अखेर मुंबई हायकोर्टाने यावर बंदी उठवली होती.
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर हा बोकड बळीचा सोहळा काल सप्तश्रृंगीगडावरील दसरा टप्प्यावर बोकडाची विधिवत पूजा करून हा सोहळा पार पडला. ट्रस्टचे पदाधिकारी, समस्त ग्रामस्थ व विविध राज्यांतून आलेल्या २५ हजार भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी संपूर्ण गडावर भाविक ‘सप्तशृंगी माता की जय, बोल अंबे माते की जय’चा जयघोष मोठ्या आवाजात करत होते.
तत्पूर्वी श्री क्षेत्र सप्तश्रृंगीगड येथे नवरात्रोत्सवाच्या दशमीनिमित्त ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धन पी. देसाई यांनी सपत्नीक श्री सप्तश्रृंगी देवीची महापूजा केली. यावेळी सप्तश्रृंगी देवीला नवीन सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आले होते. तसेच, सालाबादप्रमाणे अश्विन नवमीस सप्तश्रृंगीगडावर नवमीच्या दिवशी शतचंडी याग व होमहवन विधीने सुरू केली जाते. त्याची पूर्णाहुती ही दशमीच्या दिवशी पुरोहितांच्या मंत्रघोषात बोकड बळीची आहुती देऊन दसऱ्याचा सोहळा पार पडला.
महसूल व पोलिस प्रशासनाच्या प्राप्त सूचनेनुसार या बोकड बळीच्या विधिवत पूजेसाठीची कायदेशीर बाबींची पूर्तता नांदुरी, सप्तश्रृंगीगडाचे सरपंच, विश्वस्त संस्था आणि परंपरेचे मानकरी यांनी केली आहे. आमदार राम शिंदे, ट्रस्टचे विश्वस्त बंडू कापसे, अॅड. ललित निकम, मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सुरक्षा विभाग प्रमुख यशवंत देशमुख यांच्यासह विविध विभागप्रमुख, पर्यवेक्षक व कर्मचारी वर्ग तसेच स्थानिक ग्रामपंचायत आणि रोप वेचे पदाधिकारी या विधीप्रसंगी उपस्थित होते.
यावेळी मौजे सप्तश्रृंगीगड येथील स्थानिक रहिवाश्यांना दसऱ्यानिमित्त विशेष दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात आले. तसेच भाविकांना सुरक्षित दर्शन घेण्यासाठी ट्रस्टमार्फत विशेष व्यवस्था करण्यात आली. ट्रस्टच्या प्रसादालयात सुमारे ५ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम