Skip to content

“सहा महिने सत्ता भोगा !” सामनाच्या अग्रलेखात मध्यावधीचे संकेत


मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने काल बहुमत चाचणी जिंकल्यानंतर शिवसेना आक्रमक भूमिका घेत आहे. तिकडे शरद पवार यांनी मध्यावधीचे संकेत दिल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाप्रमुख व आमदारांना मध्यावधीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. तर दुसरीकडे आज सामनाच्या अग्रलेखात शिंदे सरकार सहा महिने टिकण्याचे भाकीत केले.

शिवसेनेच्या सामना मुखपत्रातील अग्रलेखात असे लिहिले की, भाजपपुरस्कृत शिंदे सरकारने बहुमत चाचणी जिंकली, पण ज्या परिस्थितीत सरकार बनवले त्यामागची प्रेरणास्थळे पाहता राज्यात दुसरे काही घडल्याची खात्री नव्हती. तसेच कालपर्यंत ठाकरे गटासोबत असलेले शिंदे गटाचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्यावरही सामनाद्वारे टीका केली. कालपर्यंत कपाळाला उटी-चंदन लावलेले बांगर रडू लागले, तेच सोमवारी शिंदे गटात पळून गेले. त्यामुळे विश्वास फक्त पानिपतात पडला असे नाही, तर महाराष्ट्रातही असे अनेक विश्वासराव पळून गेले.

तसेच भाजप आणि देवेंद्र फडणवीसांवर देखील अग्रलेखात टीका करत म्हणाले, भाजप शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेतला. हे चोरलेले बहुमत आहे, हा राज्यातील ११ कोटी जनतेचा विश्वास नाही. शिंदे गटावर विश्वास व्यक्त करताना भाजप आमदारांची डोकी अस्वस्थ झाले असतील. फडणवीसांचे अभिनंदनपर भाषण हे सरळ सरळ उसने अवसान असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. आधीची अडीच वर्ष ते आले नाही आता दिल्लीच्या तडजोडीने ते लंगड्या घोड्यावर बसले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे याचीही आठवण करून दिली.

सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन आलेला नाही. सुरतपासून गुवाहाटी ते गोव्यापर्यंत हे सरकार एखाद्या सांगाड्यासारखे भाजपच्या रुग्णवाहिकेतून अवतरले. बहुमत सिद्ध केल्याने पुढचे सहा महिने सरकारला कोणताच धोका नाही असे ज्यांना वाटते ते भ्रमात आहे. भाजपचे लोक त्यांना ठरल्यानुसार सरकार पाडतील आणि मध्यावधीच्या खाईत जनतेला लोटतील, असे संकेत दिले.

अजित पवार यांचे विधानसभेतील विधान घेत म्हटले, जो इशारा अजित पवार यांनी दिला तो आता त्यांच्या लक्षात येणार नाही. कारण त्यांची झापडे बंद आहे, पण जेव्हा त्यांच्या लक्ष्य येईल तेव्हा त्याला उशीर झाला असेल. तसेच शिंदेंचे म्हणणे हे शिवसेना-भाजप युतीचे मुख्यमंत्री असल्याचे जाणीवपूर्वक बोलून लोकांमध्ये भ्रम पसरवतात. हीच भाजपची कपटी खेळी आहे, अशीही टीका सामनाच्या अग्रलेखात केली. ज्यांच्यामागे ईडी लावली त्यांना आता सरकारी संरक्षण द्यावे लागते, असेही त्यात लिहिले आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!