नाशिक : बुधवारी विजयादशमीच्या दिवशी प्रभू श्रीरामच्या जयघोषात सर्वत्र रावणदहनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी गांधीनगर व पंचवटी यांसह कॉलेजरोड, गंगापूर रोड, इंदिरानगर आदी भागांतही रावणदहनाच सोहळा पार पडला होता. त्यात नाशिककरांचे विशेष आकर्षण असलेले ६० फुटीच्या रावणाचा दहन येथील रामकुंड परिसरात करण्यात आला होता. विशेष म्हणजे, चतुःसंप्रदाय आखाड्याच्या ह्या रावण दहन सोहळ्याचे यंदाचे ५५वे वर्ष होते. १९६७ साली महंत दिनबंधुदास महाराज या आखाड्याचे प्रमुख असताना त्यांनी या रावणदहनाची प्रथा सुरू केली, त्यानंतर महंत कृष्णचरणदास यांनी ही प्रथा अविरत सुरु ठेवली. कोरोना निर्बंधांमुळे दोन वर्ष ह्यात खंड पडला होता. मात्र, यंदा मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला.
रावण दहनापूर्वी राम, लक्ष्मण, सीता, रावण, बिभीषण व वानरसेना यांची पंचवटी कारंजा ते रामकुंड पर्यंत पारंपारिक मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर श्रीराम व रावणाच्या राक्षस सेनेत तुंबळ युद्ध रंगले. आमदार राहुल ढिकले, माजी महापौर अशोक मुर्तडक, बाळासाहेब सानप, सतीश शुक्ल आदींच्या उपस्थितीत साडेसातच्या सुमारास रावणदहनाचा सोहळा पार पडला. या वेळी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त अमोल तांबे, गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, आखाड्याचे प्रमुख महंत कृष्णचरणदास, पंचवटीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे आदींसह नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीने आसमंत उजाळून गेला.
जवळपास दोन वर्षांनंतर रामकुंडावर रावणदहनाचा सोहळा होत असल्याने नदीकाठी नाशिककरांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, रावणदहनाच्या पार्श्वभूमीवर पंचवटी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवत मुख्य मार्गांवरील वाहतूकीत बदल करण्यात आले होते. तसेच, मालेगाव स्टँडसह इंद्रकुंड येथून रामकुंड परिसरात येणार्या रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. त्यामुळे रामकुंड, सरदार चौक, शनी चौक, मालेगाव स्टॅन्ड, पंचवटी कारंजा, दिल्ली दरवाजा, तिवंधा चौक भागात काहीकाळ वाहतुक कोंडी झाली होती.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम