जनतेच्या विविध प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचे आयोजन : तहसीलदार सूर्यवंशी

0
1

देवळा : १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या कालावधीत जनतेच्या विविध प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला असून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

सर्वसामान्य जनतेची कामे विहित कालावधीत व्हावीत याकरीता राज्य शासनाने सन २०१५ मध्ये आपले सरकार सेवा पोर्टल सुरु केले आहे. त्या माध्यमातून जनतेची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण होणे अपेक्षित आहे. तथापि, सदर पोर्टलचा आढावा घेतला असता व मंत्रालय स्तरावर नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे अवलोकन केले असता अनेक प्रकरणी संबंधित नागरिकांचे अर्ज, तक्रारी यांचा सक्षम प्राधिका-यांकडून विहित कालमर्यादेमध्ये निपटारा होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.

या पार्श्वभूमीवर सर्व प्रलंबित संदर्भअर्ज, तक्रारी यांचा निपटारा करणेकरिता दि. १७ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोंबर, २०२२ या कालावधीत सेवा पंधरवडा राबविण्याचे शासनाने निश्चित केले आहे. सेवा पंधरवाडयात खालीलप्रमाणे नमूद संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या व दि. १० सप्टेंबर २०२२ रोजी प्रलंबित असलेल्या सर्व अर्जाचा मोहिम स्वरुपात निपटारा करण्यात येणार आहे.

आपले सरकार वेबपोर्टल – ४०४ सेवा, महावितरण पोर्टल – २४ सेवा, डी. बी. टी. पोर्टल- ४६ सेवा, नागरी सेवा केंद्रामार्फत देण्यात येणा-या शासकीय सेवा, विभागाच्या स्वत:च्या योजनांशी संबंधित पोर्टलवरील प्रलंबित अर्ज, याव्यतिरिक्त सोबत जोडलेल्या सहपत्रातील १४ सेवा तसेच सेवा पंधरवड्यामध्ये प्रामुख्याने सर्वसामान्य जनतेशी निगडीत असणाऱ्या महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, नगरविकास विभाग, कृषि विभाग, आदिवासी विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, ऊर्जा विभाग तसेच सर्व शासकीय विभागांकडील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत अधिसूचित सेवा विषयी प्रलंबित कामांचा विहित कालमर्यादेमध्ये निपटारा करण्याकरीता कार्यपध्दती निश्चित करण्यात आली असून अंमलबजावणीकरिता सर्व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करुन देण्यात आली आहे.

सेवा पंधरवडा समाप्तीनंतर दि. ५ ऑक्टोबर २०२२ रोजी सर्व सक्षम प्राधिकारी यांचेकडून दि. १० सप्टेंबर २०२२ अखेर प्रलंबित संदर्भापैकी निपटारा करण्यात आलेले संदर्भ व निपटारा न झालेल्या संदर्भाविषयी स्वयंस्पष्ट कारणांसह प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रत्येक शासकीय विभागामार्फत सेवा पंधरवडा कालावधीत केलेल्या कामकाजाविषयीचा प्रमाणपत्रासह जिल्हानिहाय प्रगती अहवाल दि. १० ऑक्टोबर २०२२ पर्यंत शासनास सादर केला जाणार आहे. अशी माहिती सूर्यवंशी यांनी दिली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here