राज ठाकरेंनी सपत्नीक घेतले शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन; उद्या सप्तश्रृंगीमातेच्या दर्शनासाठी वणीला येणार

0
30

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यांचा हा दौरा राजकीय नसून ते विविध ठिकाणच्या धार्मिकस्थळांचे दर्शन घेणार आहेत.

त्यानुसार नाशिकला येण्यापूर्वी आज राज ठाकरेंनी शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतले आहे. सकाळी साडेआठ वाजता शिर्डी विमानतळावर खाजगी विमानाने राज ठाकरे यांचे आगमन झाले. त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, नेते बाळा नांदगावकर, महिला सेना अध्यक्षा रिटा गुप्ता व आदि या दौऱ्यात आहेत. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह भाजपचे आमदार सुजय विखे पाटील हेदेखील उपस्थित होते. त्यानंतर ते शिर्डीच्या साईबाबा मंदिरात आगमन झाले. यावेळी शिर्डी संस्थानच्या वतीने ठाकरे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला होता. दर्शनानंतर ते पुन्हा विमानाने ओझरकडे रवाना झाले.

ओझरहून नाशिकला आगमन होताच यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, ज्येष्ठ नगरसेवक सलिम शेख, प्रवक्ते पराग शिंत्रे, डॉ. प्रदीप पवार आदींनी त्यांचे स्वागत केले.

नियोजित कार्यक्रमानुसार राज ठाकरे ओझर विमानतळाहून येथील एसएसके हॉटेल येथे येणार आहे. तेथे ते पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. त्यानंतर रात्री मुक्काम करुन ते रविवारी (दि. २) सकाळी ८.३० वाजता वणी येथील श्री सप्तश्रृंगीगडावर सप्तश्रृंगी मातेचे सपत्नीक दर्शन घेणार आहेत. देवीच्या दर्शनानंतर ते परत ओझर विमानतळ येथून मुंबईच्या दिशेने रवाना होतील, अशी माहिती मनसे नेते पराग शिंत्रे यांनी दिली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here