द पॉईंट नाऊ : काल दुपारी पावणेचार ते सहा वाजेपर्यंत झालेल्या वादळी पावसाने संपूर्ण शहरासह उपनगरांना जलमय केले. धो-धो कोसळलेल्या पावसामुळे अवध्या दीड तासांत ६९ मिमी पाऊस पडल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली.
मुंबईच्या कुलाबा वेधशाळेकडून नाशिकला सोमवारी गडगडाटी वादळी पावसाची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला होता. काही उपनगरांमध्ये दुपारी साडेतीन वाजेपासून अचानकपणे अंधारून आले. ढग दाटण्यास सुरुवात झाली. विजांचा कडकडाट अन् बंगांचा गडगडाट ऐकू येऊ लागला. सोसाटयाचा वाराही सुटला आणि क्षणार्धात मुसळधार सरीचा वर्षाव सुरू झाला.
शहरातदेखील त्याच वेळी पावणेचारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. अवघ्या दीड तासांत झालेल्या या जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले. महापालिकेने काही दिवसांपूर्वी बुजविलेले खड्डे पुन्हा एकदा या पावसाने उघड़े केले सखल भागात पावसाचे पाणी साचले होते. अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता.
सुमारे दीड तास शहर व परिसरात पाऊस सुरू राहिला, तासभर पावसाचा जोर टिकून होता. त्यानंतर सरी मध्यम झाल्या. अचानकपणे आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. नाशिककरांनी मागील दहा दिवसांपासून रेनकोट घरात ठेवून दिलेले होते. पावसाने गांधी जयंतीपासून विश्रांती घेतली होती; मात्र सोमवारी अचानकपणे झालेल्या मुसळधार पावसाने नाशिककरांना चिंब भिजविलें. सुमारे तासभर झालेल्या पावसाने शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. तर उड्डाण पुलावर पाणी साचल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली.
मुंबईच्या कुलाबा वेधशाळेकडून पुढील चार दिवस देण्यात आलेला पावसाचा इशारा
नाशिकसाठी मंगळवारी (दि. ११) मध्यम पाऊस.
बुधवारी (दि.१२) पुन्हा सामान्य पाऊस किंवा गडगडाटासह सरी.
गुरुवारी (दि.१३) अंशतः ढगाळ आकाश
शुक्रवारी (दि.१४) अंशतः ढगाळ आकाश
शनिवारी (दि.१५) गडगडाटी वादळ किंवा पाऊस असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम