नाशिक – ग्रामीण भागातील नागरिकांच्या विविध समस्येकडे केले जाणारे दुर्लक्ष, नियमबाह्य कामे यांविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज जिल्हा परिषदेसमोर निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू बोडके यांनी सांगितले, जिल्ह्यातील ग्रामीण भागांमधील अनेक प्रश्नांकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. तसेच, बांधकाम विभागाकडून होणाऱ्या कामांमधील अनियमततेसह काही विभागांमधून होत असलेली नियमबाह्ये कामे, जिल्ह्यातील दिव्यांगांच्या प्रश्नांकडे समाजकल्याण विभागाचे दुर्लक्ष, त्याचसह जनतेला विविध योजनापासून वंचित ठेवणे, याचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहोत.
दरम्यान, ह्या मुद्द्यांवर अनेकदा आम्ही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र, त्याकडे त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. असा आरोप त्यांनी प्रशासनावर केला आहे. तसेच विविध विभागाचे अधिकारी ह्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून त्याचा मोठा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने आतातरी लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
आंदोलनानंतर पक्षाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तु बोडके, जिल्हाप्रमुख संतोष गायधनी, शहरप्रमुख श्याम गोसावी, शरद शिंदे, अमजद पठाण, मंगेश खरे, कमलाकर शेलार, मिलिंद वाघ यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम