नाशिक: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका आणि परिसर कांदा, डाळिंबाच्या उत्पादनासाठी ओळखला जातो. या भागातील कष्टकरी शेतकरी सूर्याची पहिली किरणे पडण्यापूर्वी शेतात दाखल होऊन शेतीत नवनवीन प्रयोग राबवून प्रगत शेती करीत असतात. आपल्या शेतात नवनवीन प्रयोग राबवून तालुक्यात प्रगतीशील शेतकरी म्हणून नावलौकिक मिळविलेल्या सातमाने येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांनी डाळिंबाची भेट दिली.
या शिष्टमंडळात सातमाने येथील प्रगतिशील शेतकरी नीलेश रवींद्र पवार, नारायण निकम, रमेश तवर, समाधान पवार, एकनाथ सोळंके आदींचा समावेश होता.
राज्यात यंदाच्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. अशा परिस्थितीत सतमानेच्या या शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे पुरेपूर नियोजन करीत कमी पाण्यात फळबाग लागवड कशी करावी याचे नियोजन केले आणि त्यात त्यांना यशही मिळाले. अश्या या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांनी पिकविलेले डाळिंब भेट देण्याची इच्छा पालकमंत्री श्री. भुसे यांच्याकडे व्यक्त केली. त्यानुसार आज या शेतकऱ्यांनी मुंबईत मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांची भेट घेतली.
यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांची आपुलकीने चौकशी केली. तसेच डाळिंबास मिळणारा बाजार भाव, डाळिंबावर येणारा मर, तेल्या रोगाविषयीची माहितीही जाणून घेतली. मालेगाव तालुक्यातील शेतकरी निसर्गाच्या बदलत्या परिस्थितीशी संघर्ष करीत पिकांचे उत्पादन घेतो, असे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी या शेतक-यांचे कौतुक करून राज्य शासन सदैव शेतक-यांच्या पाठिशी असून प्रगतीशील शेतक-यांनी त्यांच्या ज्ञानाचा परिसरातील शेतक-यांना लाभ होण्यासाठी मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही केल्यात.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम