Political News | राज्यभरात विधानसभा निवडणुकीची धुमाळी असून सर्वच पक्ष सध्या जागावाटपांमध्ये व्यस्त आहेत. त्यात आज भाजपाने आपली पहिली यादी जाहीर केली असून आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील उमेदवारांची यादी जाहीर होण्याची चिन्ह आहेत. अशातच शरद पवारांनी मोठी खेळी खेळत विनायक मेटेंचा शिवसंग्राम पक्ष आपल्या बाजूने वळवत नवा डाव टाकला आहे. आज दि. 20 ऑक्टोबर रोजी शिवसंग्राम पक्षाच्या प्रमुख ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करत, येत्या विधानसभा निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे.
कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही- ज्योती मेटे
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत आपला उमेदवार उभा करणार असल्याची माहिती पक्षप्रमुख ज्योती मेटे यांनी यापूर्वीच दिली होती. त्यावेळी, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्यासह शरद पवार पक्षाशी बोलणी सुरू असल्याचे सांगितले होते. त्या बीड मधून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची माहिती होती. यावेळी त्यांनी शिवसंग्राम पक्ष कुठल्याही परिस्थितीत विलीन करणार नसल्याचे ही स्पष्ट केले होते. तसेच “आम्ही शिवसंग्राम पक्ष म्हणून लढण्यावर जास्त भर देत आहोत.” असे देखील त्या म्हणाल्या होत्या. त्यामुळे आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी घेतलेला हा निर्णय कितपत सफल ठरतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बीडमध्ये उमेदवारवरून रस्सीखेच
त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदीप क्षीरसागर हे बीड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून राष्ट्रवादीमध्ये पोट पडल्यानंतर त्यांनी शरद पवारांची साथ दिली त्यामुळे त्यांना बीडमधून उमेदवारीसाठी अपेक्षा असून ज्योती मेटे यादेखील बीड मधून लढण्यात इच्छुक असल्यामुळे दोघांमध्ये उमेदवारीवरून चुरस पाहायला मिळणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम