पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक तथा भाजपचे विद्यमान पदाधिकारी शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने उधळून लावला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्याला माथाडी ची कामे मिळावी यासाठी परिसरात दहशत पसरवण्याच्या हेतूने या तिघा आरोपींनी भाजपचे विद्यमान पदाधिकारी शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट रचला असल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर या तिघा जणांना अटक केली, दरम्यान त्यांच्याकडून पिस्तूल आणि जिवंत काडतुसे देखील पिंपरी चिंचवड पोलिसांनी हस्तगत केली आहेत. तसेच या कटामागे नक्की कुणाचा हात होता आणि फक्त दहशत पसरवण्याच्या हेतूनेच हे तिघेही आरोपी शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट रचत होते की त्यांना कोणी सुपारी दिली होती अशा वेगवेगळ्या अंगाने पोलीस या प्रकरणाचा तपास करणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त स्वप्न गोरे यांनी दिली आहे.
दरम्यान आपला कुणाशी वाद नसून आपण कोणतही माथाडीचं काम करत नाही यामुळे आपल्याच हत्येचा कट रचन ही गंभीर बाब आहे. याप्रकरणी पोलिसांनी सत्य समोर आणावं आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी म्हणून आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती शेखर ओव्हाळ यांनी दिली आहे.
दरम्यान मागील आठवड्यात दर्शना पवार हत्याकांड त्यानंतर दोन दिवसांपूर्वी पुण्यातील भर वस्तीत असलेल्या सदाशिव पेठ या ठिकाणी एका तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता भाजपचे विद्यमान पदाधिकारी शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानं शहरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन पुणे शहरात वाढत असलेली ही गुन्हेगारी आटोक्यात आणावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम