मुंबई : राज्यात गेल्यावर्षी गाजलेल्या देवळा मुद्रांक घोटाळ्या संदर्भात तपास यंत्रणांनी कानाडोळा केल्याचा आरोप करत यासंदर्भात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून या याचिकेमध्ये देवळा पोलीस स्टेशन, ईडी, आयकर विभाग व महाराष्ट्र शासन यांना देखील प्रतिवादी करण्यात आले आहे यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपी व त्याच्या कुटुंबीयांची मागील 8 ते 10 वर्षात कमावलेल्या संपत्तीची चौकशी करण्यासंदर्भात उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. मुद्रांक घोटाळ्यातील संशयित आरोपी जामिनावर बाहेर असून जामीन मिळाल्यावर देवळा पोलिसांनी बघ्याची भूमिका घेत जामिनाला कुठलाही विरोध केला नाही यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत देवळा पोलिस स्टेशनला देखील प्रतिवादी या याचिकेत केले आहे.
मुद्रांक घोटाळा खरच झाला का यासंदर्भात संशय निर्माण केला गेला अनेक तक्रारदार नंतर आमची फसवणूक झाली नसल्याचे म्हटल्याने या प्रकरणाने वेळोवेळी नाट्यमय वळण घेतले. ज्यांनी या प्रकरणाचा पाठ पुरावा केला त्यांनी देखील कालांतराने आपल्या तलवारी म्यान केल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. ‘द पॉइंट नाऊ’ मीडियाने आवाज उठवला मात्र संबंधितांनी अब्रू नुकसानीची नोटीस पाठवत आवाज दाबण्याचा प्रयत्न केला यामुळे हे प्रकरण आता कोर्टात गेल्याने नेमकं कोणते वळण घेते हे बघणे महत्वाचे आहे.
मुद्रांक घोटाळ्यात संबंधीत मुद्रांक विक्रेत्याचा परवाना देखील रद्द केला असून पोलिस अधिक तपास करत आहेत मात्र या तपासावर संशय व्यक्त करत दीपक झाडे यांनी हायकोर्टात ही याचिका दोन दिवसापूर्वी दाखल केली असून त्यांच्या वतीने जेष्ठ विधिज्ञ एकनाथ ढोकळे हे बाजू मांडत आहेत. लवकरच पहिली तारीख मिळणार असून हा विषय कोर्टात किती दिवस रेंगाळतो हे बघण देखील महत्वाचे आहे. कोर्टात प्रकरण गेल्याने देवळा पोलिसांच्या भूमिकेवर देखील कोर्ट काय प्रतक्रिया देते हे बघणे महत्वाचे आहे.
मी सर्व तपास यंत्रणेचे उंबरठे झिजवले मात्र मला न्याय मिळाला नाही. मी देवळा पोलिस स्टेशनला वेळोवेळी विचारपूस केली मात्र समाधानकारक उत्तर मिळाली नाहीत इडी, आयकर विभाग यांनी देखील लक्ष न दिल्याने शेवटी मला कोर्टात अपील करावे लागले न्यायदेवता नक्की न्याय देईल अन् दोषींना शिक्षा होईल त्यांच्या संपत्तीची तपासणी होईल याची मला खात्री आहे.
– दीपक तुळशीराम झाडे, याचिका कर्ते
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम