Nashik : अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि आता शरद पवार आणि अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस युती सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अनिल पाटील, धर्मरावबाबा आत्राम, संजय बनसोडे, आदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर राज्यातील विविध जिल्हा आणि तालुका स्तरावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीचे परिणाम दिसून येत आहेत.
तसेच राष्ट्रवादीतील फुटीचा परिणाम नाशिक मध्येही दिसून येत आहे. छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक असलेले दिलीप खैरे आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास खैरे यांनी नाशिकमधील राष्ट्रवादी भवन कार्यालयावर काही समर्थकांसह ताबा मिळवला आहे. आता नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट आमनेसामने आले आहेत. दोघांमध्ये जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळत आहे.
नाशिकमधील राष्ट्रवादी कार्यालयावर कब्जा केल्याने दोन्ही गट आक्रमक झाल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. दोन्ही गट सध्या घोषणाबाजी करत आहेत. पोलीस या दोन्ही गटांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले आणि दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. दोन्ही गट राष्ट्रवादी भवन कार्यालयावर ताबा असल्याचा दावा करत आहेत.
यावेळी नाशिक शहर अध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे, रवींद्र पगार, माजी नगरसेवक गजानन शेलार, जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आवाड यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत. आम्ही शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचे गजानन शेलार व कार्यकर्त्यांनी सांगितले. शरद पवार यांनी मेहनत घेऊन हा पक्ष बांधला आहे. या कार्यालयाला शरद पवार यांच्या वेलफेअर फाऊंडेशनचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यालयावर आमचा दावा आहे.
एकीकडे राज्यपातळीवर नेते आमने-सामने येत पक्ष आणि चिन्हावर दावा करत असताना दुसरीकडे नाशिक मध्ये शरद पवार समर्थक आणि अजित पवार समर्थक एकमेकांसमोर येऊन कार्यालयावर दावा सांगत आहेत. यामुळे राज्यपातळीसह स्थानिक पातळीवरच राजकारण देखील रंगात आला आहे. दोन्ही गटाच्या समर्थकांमध्ये राज्यभरात खडा जंगी होत असल्याचे देखील बघायला मिळत आहे.
https://thepointnow.in/will-chhagan-bhujbal-be-the-guardian-minister-of-nashik/
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम