मुंबई : सहा जिल्ह्यांना एकाच पालकमंत्री, ते पालकमंत्री आहेत की स्पायडरमॅन ? अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
गेल्या आठवड्यात शिंदे-फडणवीस सरकारने राज्यभरातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक-दोन नाही, तर तब्बल सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आलेली आहे. असे म्हटले जाते, की ते नियोजन मंत्री म्हणून ह्या सहा जिल्ह्यांचे पालकत्व घेतले आहे. मात्र याच मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उडवली आहे. आता त्यात नाना पटोलेंनी टीका करत देवेंद्र फडणवीसांवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. ते प्रसारमाध्यमांशी यावेळी बोलत होते.
नेमके काय म्हणाले पटोले ?
नाना पटोले यांनी टीका करताना म्हणाले, की शिंदे-फडणवीस सरकारने तीन महिन्यानंतर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्यात. पण सर्वात गंभीर बाब म्हणजे सहा जिल्ह्याला एकच पालकमंत्री दिला आहे. हा पालकमंत्री आहे की स्पायडरमॅन ? सहा जिल्ह्यांच्या विकासकामांसाठी ते कसा वेळ देणार ? या दोघांच्या वादामुळे जिल्ह्यातील विकासकामांचा बोजवारा उडाला आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
तसेच, महाराष्ट्रातील उद्योगधंदे व गुंतवणूक गुजरातमध्ये पाठवली जात आहे. आता तर महाराष्ट्राचे दोन मंत्री गुजरातमध्ये जाऊन आले. ते महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये कसे पाठवायचे याचा अभ्यास करायला गेले होते काय ? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. सध्याचे सरकार हे दिल्लीच्या इशाऱ्यावर चालत असल्याचे म्हणत दिल्लीला विचारल्याशिवाय ते कोणताच निर्णय घेऊ शकत नसल्यामुळे ते सतत दिल्लीच्या वाऱ्या करत असल्याची टीका पटोलेंनी केली आहे.
यावेळी पटोलेंनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेबद्दल बोलताना, राहुल यांचा साधेपणा व नम्रपणा लोकांना भावतो आहे, त्यामुळेच या यात्रेला लोकांचा पाठिंबा मिळत आहे. पण काही विकृत मनोवृत्तीचे लोक पदयात्रेला व काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना यात यश मिळणार नाही. त्यामुळे जे लोक घाबरलेले आहेत तेच जाणीवपूर्वक पक्षाविषयी व पक्षातील नेत्यांबद्दल अफवा पसरवत आहेत. तसेच, राज्यात ही पदयात्रा सर्वात मोठी होणार असून यात अनेकांनी आपला सहभाग नोंदवला आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम