जिल्ह्यात चाललंय काय ? मनमाडनजीक गॅस सिलेंडर घेऊन जाणारी ट्रक उलटली

0
36

नाशिक : नाशिक जिल्ह्यासाठी आजचा दिवस अग्नितांडवाचा दिवस ठरला. सकाळी सलग दोन आगीच्या घटनांनी नाशिक आधीच हादरले असताना आता मनमाड येथे ऑक्सिजन गॅस सिलेंडर घेऊन जाणारी ट्रक उलटून तिचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली.

मनमाडजवळील पुणे-इंदूर महामार्गांवर दुपारच्या सुमारास हा भीषण अपघात घडला असून अपघातानंतर त्या ट्रकचा मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता, की ज्यामुळे ट्रकमध्ये असलेले ऑक्सिजन गॅस सिलेंडर २० तर २५ फूट हवेत उडाली होती. दरम्यान, ट्रकमधील असलेल्या सिलेंडर्सचा मोठा स्फोट होत असल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक सुमारे २ किलोमीटर अंतरावर रोखून ठेवण्यात आली होती. मात्र आता खबरदारीचा उपाय म्हणून तेथील वाहतूक वळविण्यात आलेली आहे. या स्फोटांच्या आवाजांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला आहे.

ही घटना घडताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, भीषण आग आणि सतत होत असलेल्या सिलिंडरच्या स्फोटांमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात पथकांना अडथळा येत आहेत. तरीही या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरु आहे. या अपघातात ट्रकचालक जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार सदर ट्रकचे पुढील टायर फुटल्याने ही घटना घडली आहे.

याआधी शहरात नांदूर नाक्यावर पहाटेच्या सुमारास आगीची भीषण दुर्घटना घडली होती. ज्यात १२ जणांचा मृत्यू, तर अनेक जण जखमी झाले आहेत. त्यानंतर वणी सप्तश्रृंगीगडावर बसला लागलेली आग आणि आता ह्या घटनेमुळे जिल्ह्यासाठी आजचा दिवस ‘काळा दिवस’ ठरला.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here