देवळा : सेवानिवृत्त शिक्षकांचा संस्थेच्या प्रगतीत मोठा वाटा असून पूर्वी सुविधांचा अभाव असतांनाही डोंगराळ भागात राहून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम केले. आजच्या शिक्षकांना पूर्वी पेक्षा अधिक सुविधा उपलब्ध आहेत . त्यामुळे त्यांनी ज्येष्ठ शिक्षकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ज्ञानदानाचे व विद्यार्थी हिताचे काम करावे असे प्रतिपादन मविप्रचे सरचिटणीस अँड नितीन ठाकरे यांनी आज येथे केले.
पिंपळगाव (वा ) येथील मविप्रच्या जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य डी के कोल्हे आपल्या ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘मविप्र’चे सरचिटणीस, अँड नितीन ठाकरे उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते, कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून चांदवड तालुका संचालक डॉ.सयाजीराव गायकवाड, देवळा तालुका संचालक विजय पगार, सेवक संचालक व प्राथमिक शिक्षणाधिकारी सी.डी.शिंदे, काजीसांगवी विद्यालयाचे प्राचार्य चित्तरंजन न्याहारकर, म.वि.प्र.सेवक सोसायटीचे उपाध्यक्ष मनिष बोरसे, मानद चिटणीस मंगेश ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डी.के.कोल्हे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. संचालक डॉ.सयाजीराव गायकवाड यांनी विद्यार्थी व संस्था विकास यासाठी संस्थेतील पुढील उपक्रम व योजना याविषयी मार्गदर्शन केले. सत्कारमूर्ती कोल्हे यांनी संस्थेचे ऋण व्यक्त करत आज इथपर्यतचा प्रवास सहज पार करू शकलो असे भावोदगार काढले. याप्रसंगी संस्थेच्या विविध शाखांचे प्रमुख ,शिक्षक, विद्यार्थी ,नातेवाईक,मित्रपरिवार उपस्थित होते .कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक बी.एस.सावंत यांनी केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम