नाशिक : जिल्ह्यातील गोरगरीब शेतकऱ्याची जीवनदायीनी म्हणून नाशिक जिल्हा बँककडे बघितले जात होते मात्र कपाळ करंट्या पुढाऱ्यांनी बँकेला घरघर लावली आहे. शेतकऱ्यांकडे कर्ज थकल्यास प्रशासकीय यंत्रणा जप्ती आणते मात्र तेच लोकांना राजकीय झालर असेल तर त्यांना दिलासा मिळत जातो याच धोरणाने सद्या जिल्हा बँकेचे वाटोळे केले आहे. ज्यांच्याकडे पैशाची कमी नाही अशा पुढाऱ्यांना कर्ज भरताना अडचणी कशा येतात हा प्रश्न पडला आहे, यामुळे कुबेर झाले कर्जबाजारी असे म्हणण्याची वेळ आली आहे.
जिल्हा बँकेत अनेक सर्वसामान्य खातेदारांचे लाखोरुपये अडकले आहेत. त्यांना पैसे काढता येत नाही , बँकेवर आरबीआयने आर्थिक निर्बंध लादले आहेत यामुळे ठेवीदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षापासून बँकेवर प्रशासक काम पहात आहे. यामुळे बँकेला गत वैभव प्राप्त होणार का याकडे खातेदारांसह शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. सध्याचे प्रशासक म्हणून अरुण कदम हे काम बघत आहेत. कदम हे अँक्शन मोडवर असून त्यांनी थेट बड्या थकबाकीदाराची टॉप 100 यादी जाहीर केली आहे. त्यांनी सक्तीने कारवाईचा निर्णय घेतला असून थकबाकीदारांची यादी गावांत सुचना फलकावर लावली असून खळबळ उडाली आहे, त्यांच्या या निर्णयाचे काय पडसाद उमटणार याकडे लक्ष लागून आहे. त्यांच्या या निर्णयाने अनेकांची झोप उडणार हे मात्र नक्की आहे. काही नेते बदनामीच्या भीतीने पैसे भरण्याची शक्यता वाढली आहे.
विशेष म्हणजे थकबाकीदारांच्या यादीत जास्त थकबाकी ही 30 वर्षे संचालक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे आमदार दिपीप बोरसे, राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या माणिकराव कोकाटे, माजी आमदार धनराज महाले यांच्याशी संबंधीत नातेवाईक आहेत. गणपतराव पाटील, त्यांचे दोन भाऊ यांच्याकडे 14.90 कोटींची थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्ज वसुलीसाठी बँकेने कडक धोरण सद्या अवलंबली जात असल्याचे समोर आले आहे.
शेतकऱ्यांना नोटिसा दिल्या व त्यांच्याकडून वसुली केली मात्र थकबाकीदार नेत्यांना वसुलीसाठी अनेकदा नोटिसा देऊनही संबंधित दाद देत नसल्याने शेवटी या थकबाकीदारांची नावे सार्वजनिक केली असून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा महत्वाचा निर्णय बँकेने घेतला आहे. माजी संचालकांनी घेतलेल्या चुकीच्या आर्थिक निर्णयांमुळे जिल्हा बँक सध्या आर्थिक संकटात आहे. बँकेची वसुली झाल्यास शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सुटतील. बँक पुर्वपदावर येण्यास मदत होईल मात्र त्यासाठी इच्छाशक्ती महत्वाची आहे.
प्रमुख थकबाकीदार बँकेला खाईत लोटणारे नेते
संचालक गणपतराव पाटील – 6.53 कोटी,
दत्तात्रय पाटील, सभापती – 1.25 कोटी,
विद्या पाटील, मा. अध्यक्ष, जि. प.- 55 लाख,
शोभा डोखळे , सभापती – 22 लाख,
विजय कोकाटे, आमदार बंधू – 21.31 लाख,
छाया भरत गोतरणे -21 लाख,
दौलत मंगळू बोरसे , आमदार बंधू- 47.51 लाख,
सयाजी मंगळू बोरसे, आमदार बंधू- 31.92 लाख,
संगीता दिलीप बोरसे ,आमदार कुटुंब – 22.48 लाख
राजेंद्र पिंगळे (नेते)- 23 लाख.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम