नाशिकच्या दोन खेळाडूंची राज्य क्रिकेट संघात निवड; संघाच्या कर्णधारपदी नाशिकची ईश्वरी सावकार

0
41

नाशिक : जिल्हा क्रिकेट व जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींसाठी अतिशय आनंदाची व अभिमानास्पद अशी बातमी. नाशिकच्या दोन खेळाडूंची १९ वर्षाखालील राज्य क्रिकेट संघात निवड झाली आहे. त्यातील ईश्वरी सावकारची राज्य संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

बीसीसीआय आयोजित राष्ट्रीय पातळीवरील महिला टी-२० सामन्यांच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे पुणे येथे राज्य संघाची निवड करण्यात आली. ज्यात सलामीवीर ईश्वरी सावकार व अष्टपैलु शाल्मली क्षत्रिय यांची १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. चंदिगड येथे १ ते ८ ऑक्टोबर दरम्यान होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी ही निवड झाली आहे. या दोन्ही खेळाडूंना प्रशिक्षक मंगेश शिरसाट यांचे सुरुवातीपासूनच मार्गदर्शन लाभले आहे.

विशेष म्हणजे, मागील हंगामात ईश्वरी सावकारची चॅलेंजर ट्रॉफीसाठी राज्याच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघातदेखील निवड झालेली होती. तसेच सुरत येथे झालेल्या १९ वर्षांखालील राज्यस्तरीय महिला वनडे स्पर्धेत महाराष्ट्रातर्फे सलामीवीर म्हणून खेळताना ईश्वरीने जोरदार प्रदर्शन केले होते. त्याच कामगिरीच्या आधारे तिला संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, ईश्वरीची दोनदा राष्ट्रीय शिबिरासाठीही निवड झाली होती.

तिच्यासोबत नाशिकची अष्टपैलु शाल्मली क्षत्रियचीही राज्य संघात निवड झाली आहे. ती उदयोन्मुख जलदगती गोलंदाज व सलामीवीर आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने वेळोवेळी झालेल्या आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत केलेल्या लक्षणीय कामगिरीच्या जोरावरच शाल्मलीची आधी महाराष्ट्राच्या संभाव्य संघात व आता अंतिम संघात निवड झाली आहे.

दरम्यान, या खेळाडूंच्या निवडीमुळे नाशिकच्या क्रिकेटविश्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या निवडीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा, सचिव समीर रकटे व इतर पदाधिकारी, सदस्य आणि प्रशिक्षक यांनी ईश्वरी व शाल्मलीचे अभिनंदन करत भविष्यातील उत्तम कामगिरीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here