Nashik | कांदा, टोमॅटोमुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडले; भांडवल नसल्याने द्राक्षछाटणीवर परिणाम

0
2

Nashik | जिल्ह्यात द्राक्षबागांच्या फळबहार छाटण्यांचे दिवस सुरू झाले आहेत तरी लिलाव बंद असल्यामुळे कांदा चाळीत सडला. तर टोमॅटोचाही लाल चिखल झाला. या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडले आहे. यातच यंदा कमी पाऊस झाल्याने पुढील काळात पाणी मिळेल की नाही याची चिंता शेतकऱ्यांना आहे. त्यातच आता द्राक्षांची छाटणी सुरू झालेली असून, त्यासाठी अनेक शेतकऱ्यांना आर्थिक चणचण जाणवू लागलेली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सावध पावित्रा घेतच छाटणी सुरू केलेली आहे.

जिल्ह्याला परकीय चलन आणि मोठी आर्थिक उलाढाल होणाऱ्या द्राक्षबागांच्या फळबहार छाटण्यांना सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये सुरुवात होत असते. पण यावर्षी असमाधानकारक पाऊस झाल्याने द्राक्ष हंगामाच्या मुख्य कामाची वेळ सुरु झालेली असताना संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता छाटण्या करून अपेक्षित फळ हातात येईल की नाही यामुळे खर्च करावा की नाही अशा द्विधा मनस्थितीत नाशिकमधील द्राक्ष बागायतदार आहेत.
सध्या नाशिकमधील निफाड, दिंडोरी, चांदवड या तालुक्यांत द्राक्षबागेच्या फळबहार छाटण्या सुरू झालेल्या आहेत. परंतु दरवर्षी सरासरी होणाऱ्या छाटण्यांच्या तुलनेत हे प्रमाण कमी असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले आहे. द्राक्षबागांच्या फळबहार छाटण्यांना आवश्यक आर्थिक भांडवल उभे करण्यासाठी शेतकऱ्यांनी काही क्षेत्रात टोमॅटो, कांदा या पिकांची लागवड करून वर्षभराच्या भांडवलाचे नियोजन केलेले असते. मात्र यंदा चालू हंगामात कांद्याच्या बाजारभावात सुधारणा होण्याच्या कालावधीत केंद्र सरकारने निर्यातशुल्क लावले आहे. नाशकात व्यापाऱ्यांनी तेरा दिवस कांदा लिलाव बंद ठेवले होते. त्यामुळे शहरातील शेतकऱ्यांच्या हातातील कांदा खराब होऊन गेला. तर, टोमॅटो मातीमोल भावाने विकायची वेळ आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. त्याचाच परिणाम द्राक्ष हंगामावर झाला असून, शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे.  दरवर्षी द्राक्ष हंगामातील कामांसाठी कळवण, पेठ, सुरगाणा तसेच गुजरातेतील डांग या आदिवासी भागातून मजुरांच्या टोळ्या पिंपळगाव बसवंत, उगाव, दावचवाडी, खडकमाळेगाव या द्राक्षशेती पट्ट्यात दाखल होतात. यावर्षी या मजुरांची संख्याही खूप कमी झालेली दिसत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here