मेनरोड येथील तीन मजली वाड्याला पहाटेच्या सुमारास आग; लाखोंचे नुकसान

0
9

नाशिक : शहरातील मेनरोड परिसरात फावडे लेन येथील राजेंद्र आंबेकर यांच्या तीन मजली वाड्याला काल बुधवारी पहाटे सव्वाचार वाजेच्या सुमारास भीषण आग लागण्याची घटना घडली. सुदैवाने ह्या घटनेत जीवितहानी टळली असली, तरी मात्र लाखोंची वित्तहानी झालेली आहे.

शहरातील गजबजलेल्या अश्या मेनरोड परिसरात अनेक जुन्या काळातील जीर्ण वाडे आहेत, त्यातील काही धोकेदायक वाडे हे पावसामुळे दरवर्षी कोसळतात. त्याच भागातील फावडे लेन येथील वाड्यात राजेंद्र आंबेकर यांच्या मालकीच्या वाड्यात आग लागली होती. जेव्हा ही आग लागली, तेव्हा वाडामालक राजेंद्र आंबेकर व मुलगा अनिरुद्ध यांनी वेळीच सतर्क होत त्वरित वाड्याच्या बाहेर पडले. ज्यामुळे ह्यात जीवितहानी टळली गेली.

मात्र, ह्या संपूर्ण वाड्यासह मंगेश परदेशी यांचे स्क्रीन प्रिंटींगचे दुकान, मन्सूर पाटणवाला यांचे मोबाईल आर्टचे दुकानही आगीच्या भक्ष्यस्थानी बनला. आगीत राजेंद्र आंबेकर यांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू, मंगेश परदेशी यांच्या मालकीचे स्क्रीन प्रिंटिंगचे मशिन्स, कॉम्प्यूटर व स्क्रीन पेंटिंगला लागणारे साहित्य आणि अन्य कच्चा माल, मन्सूर पाटणवाला यांच्या मालकीचे मोबाईल आर्ट आणि फोटो फ्रेम दुकानातील मागील बाजूस असलेल्या गोडाऊनमध्ये फ्रेमसाठी लागणारा सर्व कच्चा माल पूर्णपणे जळाला. तसेच वाड्याला लागून असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या पूजा मोरे (एमएच- १५- डीपी- ५१०८) व शीतल वाघ (एमएच- १५- जीझेड- ५३९८) यांची अॅक्टीवा गाडी याही या आगीत जाळून खाक झाल्यात.

दरम्यान, ह्याची माहिती अग्निशमन दलाला कळताच तत्काळ ते घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मुख्य अग्निशमन केंद्र अधिकारी राजेंद्र बैरागी, लिडींग फायरमन इक्बाल शेख, फायरमन विजय शिंदे, किशोर पाटील, राजेंद्र पवार, सोमनाथ थोरात, विजय नागपुरे, शरद देटके, गणेश गायधनी, विजय चव्हाणके, विजय गायकवाड, नितीन मस्के, नंदू व्यवहारे, संतोष आगलावे, पी. बी. परदेशी, डी. एच. चंद्रमोरे आदींसह अन्य कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. आणि सकाळी ९ च्या सुमारास आग पूर्णपणे विझवली.

यावेळी अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली असता ही आग शॉटसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. मात्र, हा वाडा पूर्णपणे लाकडी स्वरुपात असल्याने काही क्षणातच संपूर्ण वाडा आगीच्या भक्ष्यस्थानी गेला. दरम्यान, भद्रकाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक नोंद करण्यात आली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here