नाशिक : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असून, देशात पुन्हा मोदी सरकार येणार..? की इंडिया आघाडी बाजी मारणार..? याबाबतची उत्सुकता आज संपणार आहे. तर, महाराष्ट्रात कोण आघाडीवर महायुती की महाविकास आघाडी याचाही आज निकाल कळणार आहे.
दरम्यान, नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी आज मतमोजणी सकाळी आठ वाजता होणार आहे. दि. २० मे रोजी नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी पाचव्या टप्प्यात मतदान पार पडले. तर, आज मंगळवार, (दि. ४) रोजी होणाऱ्या या मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.(Nashik News)
मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
यावेळी बोलताना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, ” दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी एकूण १ हजार ९२२ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली असून, नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी १ हजार ९१० मतदान केंद्रांवरती मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान, या दोन्ही मतदारसंघांसाठीची ही मतमोजणी केंद्रीय वखार महामंडळ गोदाम, अंबड औद्योगिक वसाहत, नाशिक येथे सकाळी ८ वाजेपासून सुरू होणार आहे. तसेच या मजमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या मनुष्यबळाचे तब्बल तीन वेळा प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. तसेच, मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
तर, या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी १४ टेबलवर अशा सहा विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच वेळी एका लोकसभा मतदारसंघासाठी एकूण ८४ टेबलवर ईव्हीएमद्वारे मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. येथे प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक, एक सूक्ष्म निरीक्षक आणि एक शिपाई असे एकूण ४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.(Nashik News)
Nashik News | निकालापूर्वी उमेदवार देवांच्या ठाई; कार्यकर्त्यांना मात्र सेलिब्रेशनची घाई
Nashik News | किती फेऱ्यांत होणार मतमोजणी..?
ईटीपीबीएमएस स्कॅनिंग व पोस्टल मतमोजणीसाठी नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदारसंघासाठी प्रत्येकी १० टेबल ठेवण्यात आले आहे. तर पोस्टल मतमोजणीसाठी एक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, एक पर्यवेक्षक, दोन मतमोजणी सहाय्यक, एक सूक्ष्म निरीक्षक असे एकूण ५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणीच्या २६ फेऱ्या होणार आहे. तर, नाशिक लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या सर्वाधिक ३० फेऱ्या पार पडणार आहे. (Nashik News)
दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी फेऱ्या –
- नांदगाव – २४ फेऱ्या,
- कळवण (अ. ज.) – २५ फेऱ्या,
- चांदवड – २२ फेऱ्या,
- येवला – २३ फेऱ्या,
- निफाड – २० फेऱ्या
- दिंडोरी (अ. ज.) – २६ फेऱ्या
नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी फेऱ्या –
- सिन्नर – २३ फेऱ्या,
- नाशिक पूर्व – २४ फेऱ्या,
- नाशिक मध्य – २२ फेऱ्या,
- नाशिक पश्चिम – ३० फेऱ्या,
- देवळाली (अ. जा.) – २० फेऱ्या
- इगतपुरी – त्र्यंबक ( अ. ज.) – २१ फेऱ्या
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम