Nashik Loksabha | नाशिकच्या उमेदवारीसाठी केदा आहेरांचा विचार न झाल्याने कार्यकर्ते नाराज..!

0
25
Nashik Loksabha
Nashik Loksabha

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | नाशिक लोकसभेची जागा भाजपला सुटेल आणि येथुन भाजपा जिल्हा नेते केदा आहेर यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा केदा आहेर आणि त्यांचे कार्यकर्ते बाळगून होते. मात्र, ही जागा शिंदे गटाला मिळाल्याने आहेर यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. दरम्यान, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नाराजीचा फटका हा नाशिक, दिंडोरीसह धुळे लोकसभेतील भाजप उमेदवारांना काही अंशी बसू शकतो.

गेल्या चाळीस वर्षांपासून केदा आहेर हे भाजपात सक्रिय आहेत. माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर यांच्यासोबत पक्षाचे काम करत असतांना जिल्हाभरात त्यांनी कार्यकर्त्यांचे मोठे जाळे तयार केले आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत असतांना त्या माध्यमातूनही त्यांचा मोठा जनसंपर्क तयार झाला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची यशस्वी कारकीर्द राहिली आहे.(Nashik Loksabha)

Nashik Loksabha | चव्हाण आणि पवारांना निवडून आणण्यात महत्वाची भूमिका

तर, २०१४ च्या निवडणुकीत माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे भाजपकडून उमेदवार असतानाही केदा आहेर यांनी प्रचारात सक्रिय सहभागी होत त्यांना मोठे मताधिक्य मिळवून दिले. तर, गेल्या निवडणुकीतही डॉ भारती पवार यांना पक्षात आणून त्यांना उमेदवारी मिळवून देण्यापासून ते त्यांना निवडून आणण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. चांदवड देवळा मतदारसंघातून सर्वाधिक ८० हजारांच्या वर मताधिक्य त्यांनी भारती पवारांना मिळवून दिले होते.(Nashik Loksabha)

स्वतःच्या इच्छेला मुरड घालून राहुल आहेरांना निवडून आणले 

तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, बाजार समिती या निवडणुकांमध्येही पक्षाची मदत न घेता स्वतःच्या ताकदीवर विजयश्री खेचून आणण्यासाठी नेहमीच महत्वाची भुमिका राहिली आहे. २०१४ च्या निवडणुकीतही केदा आहेर यांनी विधानसभा लढवावी, असा जनतेचा मोठा आग्रह होता. मात्र, स्वर्गीय डॉ. दौलतराव आहेर यांच्या शब्दाला मान देऊन स्वतःच्या व जनतेच्या इच्छेला मुरड घालून चांदवड देवळा विधानसभा मतदार संघात कमळ फुलवत आमदार डॉ. राहुल आहेरांना निवडून आणण्यासाठीही केदा आहेर यांची महत्वाची भुमिका राहिली आहे.

त्यामुळे केदा आहेर यांची आजपर्यंतची एकूण कारकीर्द पाहता, त्यांना पक्षाकडून नाशिक लोकसभेची उमेदवारी मिळेल हि आशा त्यांच्या कार्यकर्त्यांना होती. पण नाशिकची जागा शिंदे गटाला मिळाल्याने आणि केदा आहेर यांच्या नावाचा विचार न झाल्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला असून, कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. यामुळे आता केदा आहेर काय भुमिका घेतात..? हे पहावे लागणार आहे. (Nashik Loksabha)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here