Nashik Loksabha | नाशिक लोकसभा ही शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही गटातून ही जागा शिवसेनेलाच देण्यात आली आहे. यात शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे, ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे, अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज, वंचितचे करण गायकर, अपक्ष उमेदवार सिद्धेश्वरानंद महाराज हे रिंगणात आहेत. नाशिकमध्ये येत्या २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. तर, उद्या प्रचाराची सांगता होणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक लोकसभेतील काही राजकीय समीकरणं समजून घेऊयात…
गोडसेंच्या कमकुवत आणि मजबुत बाजु
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकवर बारीक लक्ष ठेवून असले तरी भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते मनापासून काम करताहेत का..? याविषयी जरा शंकाच आहे. उमेदवारी मिळण्यास महिनाभर उशीर झाल्याने या काळात महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात आघाडी घेतली. तर, छगन भुजबळ, दिनकर पाटील, माणिकराव कोकाटे या नेत्यांची समजूत काढण्यातच गोडसेंचा बराच वेळ गेला.(Nashik Loksabha)
परिणामी आता सगळीकडून गोडसेंनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. सुधाकर बडगुजर यांना ऐन निवडणूक काळात तडीपार करणे, एकनाथ शिंदे यांनी पैशांच्या बॅगा नाशकात आणल्याचे आरोप यातूनही महायुतीच्या इमेजवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे निवृत्ती अरिंगळे, शिवसेनेचे विजय करंजकर, भाजपचे अनिल जाधव यांच्या माघारीमुळे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी शांतिगिरी आणि सिद्धेश्वरानंद यांच्या उमेदवारीमुळे त्यांची वाट खडतर झाली आहे. कारण यामुळे महायुतीची हक्काची हिंदुत्ववादी मतं विभागली जाणार आहेत.
Nashik Loksabha | नाशिकमध्ये ठाकरे-शिंदे गट आमने सामने; तर, शिंदेंनी चालवला काल्पनिक बाण
वाजे यांच्या कमकुवत आणि मजबुत बाजु
तर, ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचा शिंदे सेनेतील प्रवेशाचा निश्चितच फटका वाजेंना बसणार असून, त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी असल्याचे वरकरणी दिसत असले. तरीही वाजेंच्या रूपातील ग्रामीण चेहऱ्याला शहरी मतदार किती स्वीकारतील का..? हादेखील प्रश्न आहे. वाजे यांचा नम्र आणि मृदू स्वभाव हे सुरुवातीला बलस्थान वाटत असले. तरीही प्रचारादरम्यान हा त्यांचा स्वभावदोष ठरत आहे. आर्थिकदृष्ट्याही उमेदवार काहीसा कमकुवत असल्याने याचा फटका आघाडीला बसतो का, हे निकालानंतर दिसेलच.(Nashik Loksabha)
ग्रामीण मतांवर प्रभाव टाकण्यात यश आले. तरी साडेअकरा लाख शहरी मतदारांवर प्रभाव टाकण्याचे आव्हान त्यांच्यापुढे कायम होते. नाशिक हा बालेकिल्ला असल्याने दोन्ही सेनेंसाठी ही लढत प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे या दोघं उमेदवारांमध्येच खरी चुरशीची लढत असणार आहे.
वंचितचे गणित काय..?
वंचित बहुजन आघाडीने करण गायकर यांना उमेदवारी दिली आहे. मुळात या मतदारसंघात दोन मराठा समाजाचे उमेदवार असताना वंचितने मराठा समाजाचाच उमेदवार देऊन काय साध्य केले..? असा प्रश्न आहे.
Nashik Loksabha | दिग्गजांच्या तोफा नाशकात धडाडणार; याचा उमेदवारांना फायदा होणार..?
सभांचा मतांवर काय परिणाम..?
नाशिकमध्ये सध्या महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या सभा आणि रॅलीचा धडाका सुरू असताना महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या सभा सुरू आहेत. यामुळे वातावरण निर्मिती कशी होते..? याबाबतही साशंकता असून, सभांनी मतांवर परिणाम होण्याचे दिवस गेल्याचे मंतदारच म्हणताना दिसत आहेत. यंदाची निवडणूक ही जनतेने हातात घेतल्याचे स्पष्ट असून, जनता जनार्दन कुणाच्या बाजूने कौल देईल हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.(Nashik Loksabha)
Nashik Loksabha | मतदार संघातील जातनिहाय मतदान
- मराठा समाज – ३, ५९, ८५५
- माळी समाज – १, ३२, ९८५
- धनगर समाज – ८४, ४९९
- अनुसूचित जमाती – २, ५२, १८६
- वंजारी समाज – १, ९७, ६६४
- मुस्लीम समाज – १, ९६, १६५
- कुणबी समाज – १, ९०, ३७०
- अनुसूचित जाती – १, ८३, ३०५
- लिंगायत समाज – ३, ५९०
- इतर समाज – १,९४, ९५० (Nashik Loksabha)
गेल्या निवडणुकीतील उमेदवार आणि मतं
- हेमंत गोडसे (शिवसेना) – ५,६३, ५९९
- समीर भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस) – १,७१, ३९५
- माणिकराव कोकाटे (अपक्ष) – १,३४, ५२७
- पवन पवार (वंचित) – १,०९,९८१
२,९२,२०४ मतांनी हेमंत गोडसे विजयी झाले होते. (Nashik Loksabha)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम