शहरात विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाची हजेरी; नागरिकांची उडाली तारांबळ

0
12

नाशिक : शहरात आज दुपारच्या सुमारास पावसाने विजांच्या कडकडाटांसह अचानकपणे जोरदार हजेरी लावली. यावेळी आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

कालच हवामान खात्याने आज व उद्या जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली होती. तसेच काही दिवसांपूर्वी मुंबई, ठाणे आदी भागात जोरदार पावसाने हजरी लावली होती. त्यामुळे इकडे शहरात आज सकाळपासून वातावरणात उकाडा जाणवत होता. मात्र, दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि चारच्या सुमारास शहरात विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली.

यावेळी शहरातील मुंबई नाका, शरणपूर रोड, सीबीएस, गंगापूर रोड आदी भागात, तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवरही जोरदार पावसामुळे पाणी साचले होते. साधारणतः ५० मिमी इतका पाऊस आज शहरात पडला असून तब्बल दोन ते अडीच तास चाललेल्या पावसामुळे नाशिककरांची चांगलीच तारांबळ उडाली होती. दरम्यान, शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या पावसामुळे सर्व खड्ड्यांमध्ये पाणी भरले आहे. यामुळे नाशिककरांना वाहने चालवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर हे खड्डे बुजवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या १५ तारखेपर्यंत शहर व जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी लावणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here