नाशिक – शहरात दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदा झालेल्या निर्बंधमुक्त वातावरणात काल गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी नाशिक मनपाने तब्बल १४४ मेट्रिक टन निर्माल्य व १.९७ लाखाहून अधिक गणेशमूर्ती संकलित केल्या आहे.
गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी व पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमाचा भाग म्हणून नदीपात्राचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने सर्व सहा विभागात निर्माल्य दान व गणेशमूर्ती संकलन केंद्रे उभारली होती, त्याला नाशिककरांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
काल झालेल्या विसर्जनादरम्यान नाशिककरांनी मूर्ती नदीपात्रात विसर्जन न करता मनपाच्या एकूण ७१ नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जनस्थळांवर मूर्ती आणि निर्माल्यदान केले आहे. त्यामुळे मनपाकडून सुमारे १४४ मेट्रिक टन निर्माल्य व १ लाख ९७ हजार ४८८ गणेशमूर्तींचे संकलन झाले आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाने याबाबत योग्य नियोजन करून हे निर्माल्य संकलित केले आहे. तसेच, मनपाच्या फिरता तलाव उपक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा विभागाचे स्वच्छता निरीक्षक आणि विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. या मोहिमेसाठी महापालिका अधिकारी, बांधकाम, विद्युत विभाग व इतर सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभले.
ह्या सामाजिक संस्था आल्या मदतीला
निर्माल्य जमा करण्यासाठी अनेक शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांनी मदत केली आहे. ज्यात के. के. वाघ महाविद्यालय, वृक्षवल्ली फाउंडेशन, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्कार सोनवणे व स्वयंसेवक, बिटको कॉलेज, दिल्ली पब्लिक स्कूल, आडगाव पोलीस स्टेशन, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय, नाशिक रोड गुरुद्वारा, रोटरी क्लब आणि भोसला मिलिटरी स्कुलच्या स्वयंसेवकांचा ह्यात सहभाग होता.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम