नाशिक : शहरातील एका इडली विक्रेत्याकडून सुमारे पाच लाख रुपये किमतीच्या नकली नोटा आढळल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी त्या संशयितास अटक करत त्याच्याकडून त्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
मलायारसन मदसमय (३३, मूळ पन्नीकार कुलूम तुदूकुडी, तामिळनाडू) असे या संशयिताचे नाव असून त्याला भारतनगर परिसरातून पकडण्यात आले आहे. यावेळी त्याच्याकडील असलेले ५०० व २००० रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तसेच त्याच्यावर मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या बनावट नोटा तो कालिकामातेच्या जत्रेत चलनात आणण्याचा त्याचा डाव होता.
यावेळी सदर बाब मुंबईनाका पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर नवरात्रोत्सवाचा बंदोबस्त सांभाळत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नकली नोटा बाजारात आणणाऱ्या संशयितावर लक्ष ठेवून होते. दरम्यान, काल (दि.६) संध्याकाळी तो या नोटा पुन्हा चलनात आणणार असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत त्या संशयितास ताब्यात घेतले.
यावेळी पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे ५०० रुपयांच्या ४० बनावट नोटा व २००० रुपयांच्या २४४ बनावट नोटा अशा ५ लाख ८ हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या तर ३ हजार ३०० रुपये रोख रक्कम त्याच्याकडे मिळाली. ही सर्व रक्कम व मोबाईल पोलिसांनी यावेळी जप्त करत त्याच्यावर बनावट भारतीय चलनी नोटा तयार करणे, त्या खऱ्या असल्याचे भासवून वापरणे व त्या बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणातील संशयित मलायारसन हा गेल्या पंधरा वर्षांपासून नाशिकमध्ये राहतो. मात्र त्याने या नोटा कुठून आणल्या, व त्या बाळगल्या आणि यात आणखी कोण साथीदार आहेत, याचे मोठे रॅकेट आहे का, याचा अद्याप उलगडा झाला नसून पोलीस त्यादृष्टीने अधिक तपास करत आहे. पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक रौंदळे करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम