नाशिक – त्र्यंबक रोडमधील जिल्हा शासकीय रुग्णालयात सामान्यांसह ग्रामीण भागातील अनेक रुग्ण उपचारासाठी रोज येतात. पण, ह्याच रुग्णालयात सामान्य रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.
जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाच्या शस्रक्रियेदरम्यान तेथील शस्रक्रियेच्या उपकरणाचे स्क्रू आणि मेटल्स तुटून पडले. त्यामुळे संतप्त झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार करताच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी ह्यासंबंधी चौकशीचे आदेश दिले आहे.
विविध भागातील सर्वसामान्य नागरिकांना अल्पदरात आरोग्यसेवा मिळावी यासाठी शासनाने जिल्हा पातळीवर जिल्हा रुग्णालये सुरू केलीत. त्यासाठी राज्य सरकार कोट्यवधी रुपयांचा निधी शासन पुरवते. मात्र, जिल्हा रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडल्याने रुग्णालयातील उपकरणांबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. दरम्यान, निकृष्ट उपकरणे खरेदी करून रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा उद्योग कुणी केला याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांनी याबाबत चौकशी सुरू केली आहे.
जिल्हा रुग्णालय नेहमीच सतत विविध कारणांनी चर्चेत आले आहे. यापूर्वी, रूग्णालयात शस्रक्रियेसाठी उपकरणे मिळत नसल्याची तक्रार झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनने तब्बल ७५ कोटी रुपयांचे साहित्य खरेदी केले होते. तसेच, ह्या खरेदीसाठीचे टेंडर हे नामांकित कंपन्यांना मिळाले होते. मात्र, उपकरणे निकृष्ट आढळून आल्याने आता ह्या टेंडरप्रणालीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम