नाशिक : आज पहाटेच्या सुमारास नाशिक-औरंगाबाद मार्गावर बस दुर्घटनेची घटना ताजी असतानाच आणखी एका घटनेने नाशिक जिल्हा आज हादरला आहे.
आज नाशिकमधील मिर्ची हॉटेलजवळ एक खाजगी बस जळाल्याची घटना ताजी असतानाच तिकडे जिल्ह्यातील वणी सप्तश्रृंगीगडावर जाणाऱ्या एसटी बसला अचानक भीषण आग लागली. सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, संपूर्ण बसचे मोठे नुकसान झाले आहे. याचा व्हिडियो समोर आला आहे.
एसटी महामंडळाची ही बस (गाडी क्र. एमएच १४ बीटी ३७५२) ही बस सप्तश्रृंगीगडावर भाविकांना घेऊन जात होती. पर्रान्तु अचानक बसने मोठा पेट घेतला. यावेळी बसचालक व वाहक यांनी वेळीच सावध होत बसमधील असलेल्या ३३ प्रवाश्यांना सुखरूपपणे खाली उतरवले. शोर्टसर्किटमुळे बसला आग लागल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. ही बस पिंपळगाव बसवंत डेपोची होती.
नेमकी ही घटना सप्तश्रृंगीगड ग्रामपंचायतीच्या टोलनाक्याजवळ घडल्याने त्वरित येथील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी यात्रा नियंत्रण समितीने तातडीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक स्वयंसेवक, विश्वस्त संस्थेचे सुरक्षा कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ, रोपवे कर्मचारी आदींना तातडीने घटनास्थळी पाचारण करून फायर एक्स्टिंविशरद्वारे तातडीने आग विझविली गेली.
यावेळी सर्वांनी प्रसंगावधान राखून वेळीच उपाययोजना योग्य प्रकारे राबविल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमध्ये कुठल्याही भाविकाला अथवा कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारे इजा झालेली नसून सर्व सुरक्षित आहेत. यावेळी भाविकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा यंत्रणाच्यावतीने करण्यात आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम