नाशिक बस अपघात : बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी ? संजय राठोडांकडून चौकशीचे आदेश

0
41

नाशिक : नाशिक-औरंगाबाद मार्गावरील बस अपघातात एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. यवतमाळमधील चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत असल्याचा संशय आला आहे. याप्रकरणी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

आज पहाटे ४ च्या सुमारास येथील मिरची हॉटेल सिग्नलजवळ डिझेल टँकरच्या धडकेत चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस पूर्णपणे जाळून खाक झाली होती. यात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूंच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान या बसची प्रवासी क्षमता एकूण ३० असताना यात जवळपास ५० प्रवासी प्रवास करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यातील काही प्रवासी हे बसच्या सीटखाली झोपले असल्याचे निदर्शनात आले आहे.

माजी मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, खासगी बसमध्ये एकावेळी केवळ ३० जणांना प्रवास करण्याची परवानगी आहे. मात्र, नाशिकमधील ज्या बसचा अपघात झाला, त्या बसमध्ये एकूण ५० जण प्रवास करत होते. त्यातील काही जण तर सीटखाली झोपले होते. तसेच, सीट्सच्या मधल्या जागेतही काही जण झोपल्याचे समजते आहे. त्यामुळे मृत व जखमींचा आकडा वाढल्याचे यावेळी सांगत यासंदर्भात अधिक चौकशी करण्याची मागणीही भुजबळांनी यावेळी केली आहे.

यवतमाळच्या पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश 

दरम्यान, यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्वरित यवतमाळ येथील चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या ऑफिसला भेट देऊन याबाबतची अधिक माहिती संचालकांकडून घेतली. शिवाय, बसमधील सुरक्षा यंत्रणेबद्दलचीही माहिती यावेळी घेतली आहे.

यावेळी संजय राठोड यांनी अधिक माहिती देताना बोलले, की ही बस चिंतामणी ट्रॅव्हल्स या कंपनीची होती. या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच सदर ट्रॅव्हल्स कंपनीच्या संचालकांकडून या बसमधील प्रवाश्यांची, तेथील सुरक्षा यंत्रणेची माहिती घेतली आहे. तसेच नाशिकचे जिल्हाधिकारी यांचेशी फोनवरून संपर्क साधला.

दरम्यान, यावेळी त्यांनी चौकशीचे आदेश देत सदर चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही संजय राठोड यांनी सांगितले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here