नाशिक : येथील मविप्र समाजाच्या कर्मवीर अँड. बाबुराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात आज प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा प्रवेशप्रक्रिया संदर्भातील माहिती व समुपदेशनपर कार्यशाळा पार पडली.
कार्यक्रमाला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगावचे प्राचार्य डॉ. जी.एम. माळवटकर व सहाय्यक प्राध्यापक शक्तीकुमार शिलेदार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना ह्या प्रवेशप्रक्रीयेबद्दल अधिक माहिती दिली. डॉ. माळवटकर यांनी प्रवेश अर्ज कसा भरावा, अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी लागणारे विविध कागदपत्रे, लागू असणारे आरक्षण, तसेच विविध वेगवेगळ्या स्तरातून होणारी प्रवेशप्रक्रिया याबद्दल विद्यार्थ्याना मार्गदर्शित केले.
तसेच प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांनी आपला युजरनेम, पासवर्ड, तसेच आपल्या मोबाईल क्रमांकावर येणारा ओटीपी या बाबी कुणालाही शेअर होणार नाही याची दक्षता घेण्यास त्यांनी आवर्जून सांगितले. यांसोबत आपला ऑप्शन फॉर्म कसा भरावा, फॅसिलीटी सेंटरला जाऊन कागदपत्रांचा कन्फर्मेशन कसे करावे, तुम्ही ज्या वर्गासाठी प्रवेश घेत आहात त्याचे रजिस्ट्रेशन, ऑप्शन फ्रीज किंवा नॉन-फ्रीज करणे व अन्य महत्वाच्या बाबी त्यांनी उपस्थितांना यावेळी सांगितल्या.
यावेळी डॉ. माळवटकर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार अभियांत्रिकीच्या वेगवेगळ्या शाखा सुद्धा निवडण्याचे आवाहन केले. प्रा. डॉ. एन. जे. साळुंखे यांनी पाहुण्यांचा परिचय व आभारप्रदर्शन केले. या कार्यक्रमात महविद्यालयाचे प्राचार्य, उपाचार्य, विविध विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच शहरी व ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम