देवळा : नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याचा लोकशाहीला बळकटी देणारा निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकारने प्रस्थापितांच्या घराणेशाही प्रवृत्तीला चपराक लगावली आहे. सामान्य जनतेमधून नेतृत्व पुढे आल्यास ठरावीक घराण्यांची राजकारणातील मक्तेदारी संपुष्टात येईल या भीतीमुळेच विरोधकांनी या निर्णयास विरोध सुरू केला असला, तरी हा निर्णय घेऊन जनतेच्या भावनांचा सरकारने आदर केला आहे, अशा शब्दांत भाजपचे नाशिक जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
सरपंचांची निवड थेट जनतेमधून करण्यात यावी अशी मागणी राज्यातील नऊ हजार ग्रामपंचायतींनी ठराव करून सरकारकडे केली होती. महाराष्ट्र सरपंच परिषदेनेही या निर्णयाचे स्वागत केले आहे. जनतेचीही तीच मागणी असताना या निर्णयास विरोध करून विरोधकांनी आपली घराणेशाही मानसिकता स्पष्ट केली आहे, असे केदा आहेर म्हणाले.
सामान्य जनतेतून नेतृत्वाचा उदय होऊ नये व सत्तेची सगळी केंद्रे आपल्या मुठीतच रहावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सतत प्रयत्न केले. आता जनतेच्या भावनांचा आदर करणारे सरकार सत्तेवर आले आहे. सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेऊन भाजप-शिवसेना सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराणेशाहीविरोधी मोहिमेचा मुहूर्त महाराष्ट्रात केला आहे, अशा शब्दांत केदा आहेर यांनी समाधान व्यक्त केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम