Skip to content

राज्यातील संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीचा प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी विधानभवनावर मोर्चा ; सुधाकर आहेर


देवळा : महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने
डॉ. डी.एम. कराड यांच्या नेतृत्वाखाली प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी ( दि ३१) जुलै रोजी मुंबईत विधानभवनावर राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे.अशी माहिती सीआटीयुचे देवळा तालुका अध्यक्ष सुधाकर आहेर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली .

पत्रकाचा आशय असा की , महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांच्या दिर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यावर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दि. २० फेब्रुवारी २०२३ रोजी विधान भवन, मुंबई येथे घेतलेल्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेच्या वेळी सकारात्मक निर्णय घेतले होते. त्याचप्रमाणे याआधीही वेळोवेळी झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मकच निर्णय झालेले होत. परंतु अद्यापपर्यंत या घेतलेल्या निर्णयांवर प्रत्यक्ष कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही . त्यामुळे या प्रलंबीत मागण्यांवर चर्चा करण्याकरिता व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी (दि. ३१ ) रोजी विधान भवनावर महाराष्ट्रातील हजारो कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे .

गेले अनेक वर्षे सातत्याने विविध आंदोलने करूनही कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित रहात आहेत. यात नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी आणि संवर्ग कर्मचारी यांना कोषागारामार्फत मासिक वेतन सेवार्थ आयडी, (जिल्हा परिषद प्रमाणे) मिळावे , २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी , त्याचबरोबर २००५ नंतर सेवेत आलेले परंतु मरण पावलेल्या कर्मचाऱ्याच्या वारसांस एकरक्कमी दहा लाख सानुग्रह अनुदान मिळावे , राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायतीमधील सर्व सफाई कामगारांना विनाअट लाड पागे समिती सवलती लागू करण्यात याव्यात, नगरपंचायतीमधील पुर्वाश्रमीचे उद्घोषणेपुर्वीचे कायम कर्मचारी ज्यांचे अद्याप समावेशन झालेले नाही त्यांचे विनाशर्त विनाअट समावेशन पुर्वलक्षी प्रभावाने करण्यात यावे, संवर्ग कर्मचारी, लिपिक, शिपाई, सफाई कामगार यांना १०/२०/३० आश्वासित प्रगती योजनेचा लाभ व पदोन्नती देण्यात यावी, शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान कामाला समान वेतन मिळावे तसेच सध्या किमान वेतन तरी कायद्यातील तरतुदीप्रमाणे मिळालेच पाहीजे.
राज्यातील कर्मचाऱ्यांना जेष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात यावी.

आस्थापना वरील कर्मचाऱ्यांना अनुकंपा व पदोन्नती मिळावी , २०१९ च्या यादीमधील कर्मचाऱ्यांना स्वच्छता निरीक्षक पदी पदोन्नती देणे आणि राज्यातील स्वच्छता निरीक्षकांकरीता जॉब चार्ट तयार करण्यात यावीत , पुर्वाश्रमीचे ग्रामपंचायत कर्मचारी आणि रोजंदारी कर्मचाऱ्याचे समावेशन झाल्यानंतर त्यांची मागील सेवा विचारात घेऊन पेन्शन करता सेवा ग्राह्य धरण्यात यावी., सफाई कामगारांना श्रमसाफल्य योजनेच्या माध्यमातून गेले अनेक वर्षापासून प्रलंबित घरकुल व घरे बांधून देण्याबाबतची कार्यवाही जलदगतीने होण्याच्या अनुषंगाने विभागीय पातळीवर आणि स्थानिक पातळीवर कमिटी गठीत करून सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घरे देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे . आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी या मोर्चात नगरपरिषद ,नगरपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सामील व्हावे ,असे आवाहान तालुका अध्यक्ष सुधाकर आहेर यांनी केले आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!