मुंबई क्रिकेटमध्ये सत्ताधारी-विरोधक एकत्र ! हे बनले नवे अध्यक्ष…

0
33

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचे निकाल काल (दि. २०) जाहीर झाले असून माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा पराभव करत अमोल काळे एमसीएचे नवे अध्यक्ष झाले आहेत.

या निवडणुकीचे विशेष असे की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व मुंबई भाजपचे नेते आशिष शेलार यांनी एकत्र येत पॅनल स्थापन केली होती. त्याच पॅनलचे अमोल काळे यांनी संदीप पाटील यांचा पराभव केला. यावेळी अमोल काळे यांना १८३ तर संदीप पाटील यांना १५८ मते मिळाली आहेत. या निवडणुकीसाठी जवळपास ३०० हून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दरम्यान, काळे यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला होता.

अमोल काळे हे मागच्या तीन वर्षांपासून एमसीए मध्ये कार्यरत होते, त्यांच्याकडे उपाध्यक्षपद होते. तसेच ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणूनही ओळखले जायचे. याआधी आशिष शेलार या पदासाठी इच्छुक होते, मात्र काही कारणास्तव त्यांनी घेतलेल्या माघारीनंतर अमोल काळे यांचे नाव पुढे आले. दरम्यान या निवडणूकीसाठी शरद पवार आणि आशिष शेलार या सत्ताधारी-विरोधकांची आगळीवेगळी युती पाहायला मिळाली होती, त्यामुळेच या निकालांबाबात सर्वाना उत्सुकता लागली होती.

संदीप पाटील यांची प्रतिक्रिया 

दरम्यान, एमसीए निवडणुकीतील पराभवानंतर संदीप पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अमोल काळे यांचे कौतुक करत अभिनंदन केले. तसेच त्यांनी माझ्यामुळे राजकारणी एकत्र आल्याचे म्हणत या निवडणुकीसाठी एकत्र आलेले राजकारणी पुढेही एकत्र राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. शेवटी एकत्र राहणे महत्वाचे असते, मुंबईचे क्रिकेट महत्वाचे आहे. संदीप पाटील महत्वाचा नाहीये, असेही ते म्हणाले आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here