सिन्नर घोटी मार्ग गेल्या काही दिवसांपासून मृत्यूचा सापळा ठरतो आहे. दिवसागणिक याठिकाणी होत असलेल्या अपघातांची संख्या वाढत असून अनेक जणांना जीवाला मुकाव लागलं आहे. अश्याच एका काल झालेल्या अपघातात माय-लेकाला आपला जीव गमवावा लागला आहे. घोटी महामार्गावरील शिव नदीवरील पुलाच्या वळणावर ट्रेलर उलटून त्याखाली दुचाकी दबून झालेल्या अपघातात सिन्नर तालुक्यातील सोनांबे येथील माय लेक मृत्युमुखी पडले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील सोनांबे येथील मायलेक सिन्नरहून घरी परतले नसल्याची बाब समोर आल्यानंतर त्यांचे मोबाईल लोकेशन ट्रेस केले. यावेळी लोकेशन ट्रेस केल्यावर ते वळणावर उलटलेल्या ट्रेलर खाली दाबले गेल्याची धक्कादायक बाब समोर आली. दरम्यान या अपघाता नंतर चालक फरार झाल्याने केवळ ट्रेलर उलटला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र यात कुठलीही जीवित हानी नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र अपघातात जीवित हानी झाली असल्याचे लक्षात येताच बचावकार्य राबविण्यात आले. दरम्यान शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे मृतदेह ट्रेलर खालून बाहेर काढण्यात आले.
या अपघातात बिलकिस हमीद शेख (३४) आणि आरमान हमीद शेख (१९) अशी ठार झालेल्या मायलेकांची नावे आहेत. बिलकीस व अरमान हे दोघे आपली दुचाकी (एमएच-१५, बीएफ -४९१९) वरून गुरुवारी दुपारच्या सुमारास सिन्नर येथे काही कामानिमित्त आले होते. यावेळी घरी परतत असतांना त्यांनी आपण घराकडे निघालो असल्याचे कुटुंबीयांना मोबाईल वरून सांगितले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी त्यांचा मोबाईल ट्रॅक केला असता रात्री १० वाजेच्या सुमारास मोबाईलचे लोकेशन शिवनदीच्या वळणावर उलटलेल्या ट्रेलरच्या परिसरात निघाल्याने पोलिसांचा संशय बळावला. दुचाकी या ट्रेलर खाली दाबली असावी असा संशय व्यक्त करत पोलिसांनी तपास कार्याला सुरुवात केली.
दरम्यान, यानंतर रात्री उशिरा अपघात स्थळी क्रेन बोलावून कंटेनर आणि त्यातून पडलेले पुठ्ठ्याचे गठ्ठे बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आले. अनेक तासांच्या प्रयत्नां नंतर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास या ट्रेलर खाली दुचाकीसह दोघा मायलेकांचे मृतदेह आढळून आले. या घटनेमुळे सोनांबे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर या वाढत्या अपघातांमुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरत असून संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे व उपाययोजना कराव्या अशी मागणी केली जात आहे. तर फरार झालेल्या अज्ञात ट्रेलर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम