राज यांच्या पत्रामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत घडला ट्विस्ट; पाहा फडणवीस काय म्हणाले ?

0
30

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्याने एक मोठा ट्विस्ट आला आहे.

सध्या अंधेरीची पोटनिवडणूक निवडणूक कार्यक्रम सुरु आहे. त्यात शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके व भाजपचे मुरजी पटेल एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. पण ही लढाई भाजपपेक्षा शिंदे गटासाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. कारण, मोठ्या राजकीय संघर्षानंतरची या दोघांची पहिलीच निवडणूक आहे.

मात्र, आता नुकताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. ज्यात त्यांनी अंधेरी-पूर्वच्या पोटनिवडणुकीतून आपला उमेदवार मागे घेऊन भाजपने निवडणूक लढवू नये, असे आवाहन केले आहे. हे पत्र लगेच राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्त करत मनसेची धोरणात्मक भूमिका, असे म्हणत ट्विट केले आहे.

काय म्हणाले ते पत्रात ?

सदर पत्रात राज ठाकरे यांनी फडणवीसांना असे आवाहन केले की, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून आपला उमेदवार मागे घ्यावा व ही निवडणूक न लढवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

तसेच त्यांनी दिवंगत आमदार रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते असल्याचे म्हणत ते शिवसेनेच्या शाखा प्रमुखापासून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. तसेच त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार असून रमेश लटके यांच्या दुःखद निधनानंतर त्यांच्या पत्नीने आमदार होण्याने कै. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल, असे भावनिक आवाहन त्यांनी केले आहे.

तसेच, त्यांनी पत्रात असेही म्हटले आहे की, जेव्हा अश्या परिस्थितीत दिवंगत आमदाराच्या घरातील व्यक्ती निवडणूक लढवते. तेव्हा आम्ही त्यांच्याविरोधात आमचा उमेदवार उतरवत नाही. असे करण्यामागे आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रध्दांजलीच अर्पण करतो, अशी माझी भावना आहे. म्हणून आपणांस विनंती करतो की, भाजपने ही निवडणूक न लढवावी. असे करणे हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही असल्याचे म्हणत राज ठाकरे यांनी फडणवीसांना आवाहन केले आहे.

देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया 

दरम्यान, राज यांच्या पत्रावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, अंधेरी पोटनिवडणुकीत मनसेने आम्हाला पाठिंबा द्यावा, यासाठी आज आशिष शेलार राज ठाकरे यांची भेट घेऊन आले. तेव्हा त्यांनी अशा पोटनिवडणुकीत आम्ही उमेदवार उभा करत नाही आणि पाठिंबाही देत नाही, असे आम्हाला सांगितले. तसेच, आम्हीही उमेदवार न देण्याची विनंती त्यांनी आशिष शेलारांकडे केली आहे. त्यानंतर मला पत्र देत निवडणुकीतून माघार घेण्याची विनंती त्यांनी केली आहे.

त्यावर बोलताना पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षात मी एकटा निर्णय करू शकत नाही. राज ठाकरे यांनी दिलेल्या पत्रावर विचार देखील करायचा असेल, तर मला माझ्या सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांची चर्चा करावी लागेल. आमचा उमेदवार घोषित झाला आणि त्याने उमेदवारी अर्ज देखील भरला आहे. पण यापूर्वी अशा काही पोटनिवडणुकांमध्ये आम्हाला योग्य प्रकारे विनंती करण्यात आली, त्यावेळी आम्ही माघार घेण्याची भूमिकाही घेतली होती. पण आता या संदर्भात काही भूमिका घ्यायची असेल, तर पक्षात चर्चा करावी लागेल. तसेच शिंदे गट आमच्यासोबत आहे, त्यांच्याशी देखील चर्चा करावी लागेल. पण नक्कीच या पत्राचा आम्ही गांभीर्याने विचार करू. मात्र जो निर्णय घ्यायचा आहे, तो चर्चेअंती घेता येईल., असे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here