Saroj aher announce support : नाशिकच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी अखेर आपली भूमिका जाहीर केली असून मतदारसंघातील विकासकामांसाठी सत्तेत जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘शरद पवार हे वडिलांसारखे असून अजितदादा भावासारखे आहेत’, मात्र या द्विधा मनस्थितीतून बाहेर पडत आमदार सरोज अहिरे यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. मतदारसंघातील विकासासाठी अजित दादांसोबत असल्याचे स्पष्ट करत नाशिक जिल्ह्यातील सहाही आमदार आता अजित पवार गटाकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर पक्षात उभी फूट पडली. यानंतर ज्येष्ठ नेत्यांसह अनेक आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दर्शवला. असं असलं तरी काही आमदार तटस्थ भूमिकेत होते. यापैकीच एक म्हणजे नाशिकमधील देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांनी अखेर कुणाला पाठिंबा देणार याबाबत भूमिका स्पष्ट केली. सरोज अहिरे यांनी नाशिक दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांच्या स्वागताला उपस्थित रहात त्यांना पाठिंबा जाहीर केला.
दरम्यान सरोज अहिरे म्हणाल्या, “माझी तब्येत खराब होती, मात्र आता बरं वाटतं आहे. मी आज अजित पवारांच्या स्वागतासाठी बाहेर पडले आहे. याचा अर्थ असाच आहे की, मी माझ्या देवळाली मतदारसंघाच्या वतीने अजित पवारांना पाठिंबा जाहीर करत आहे. हॉस्पिटलमध्ये असताना माझी फोनद्वारे सर्वांशी चर्चा झाली आहे. सगळ्यांचं एकच मत होतं आणि ते म्हणजे आपण विकासाबरोबर जायला हवं.”
देवळाली मतदारसंघाचा पूर्ण विकास करण्यासाठी सत्तेबरोबर जा, असा सर्वांचा आग्रह होता. एकलहरा प्रकल्पासह इतर जनतेचे प्रश्न आणि राहिलेली कामं पुढील एक ते दीड वर्षात करण्यासाठी सत्तेबरोबर, अजित पवारांबरोबर राहा हा जनतेचा आग्रह आहे, ” असं सरोज अहिरेंनी सांगितलं.
यावेळी मी शरद पवारांना नेहमी भेटत राहीन, चर्चा करत राहीन आणि मार्गदर्शन घेत राहीन. कारण राजकारण हा माझ्यासाठी वेगळा भाग आहे. शरद पवार माझ्यासाठी माझ्या वडिलांप्रमाणे आहेत. त्यांच्याबरोबर माझं भावनिक नातं आहे,” अशी भावना देखील सरोज अहिरेंनी व्यक्त केली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम