Maharashtra Bandha | विरोधी पक्षांकडून बंदची हाक; उद्या राज्यात काय बंद काय सुरू असणार..?

0
48
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024

Maharashtra Bandha : 20 ऑगस्ट रोजी उघडकीस आलेल्या, बदलापुरातील चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचारानं महाराष्ट्राला हादरवून सोडले. त्यानंतर महाराष्ट्राच्या इतर भागातूनही स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराची प्रकरणे बाहेर येऊ लागली. याच पार्श्वभूमीवर राज्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न असून स्त्रिया व बालकांवर होत असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून शनिवार 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे या बंदामुळे महाराष्ट्रातील अनेक सेवांवरती परिणाम होणार असून चाकरमान्यांना यांचा फटका बसू शकतो अशी शक्यता आता वर्तवली जात आहे.

बंदाविरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल

बदलापुरात झालेल्या घटनेच्या निषेधार्थ पुकारल्या गेलेल्या महाराष्ट्र बंदा संदर्भातील याचिका मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी केली जाणार असून दुपारपर्यंत बंदावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

बंदामुळे शाळा महाविद्यालय इस्पितळ तसेच सर्वसामान्यांच्या जीवनावरती परिणाम होणार असून येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीला विचारात घेऊन महाविकास आघाडीने हा बंद घोषित केला असल्याचा दावा ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात बंदाविरोधात याचिका दाखल करत केला आहे. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार आहे.

CM Eknath Shinde | अन् ठाकरे गटाने मुख्यमंत्र्यांना तोंडावर पाडलं; चिमूकल्यांवरील अत्याचाराच्या घटनांचेही राजकारण

24 तारखेचा बंद बेकायदेशीर असून बंद पुकारणाऱ्यांवरती व बंदा मध्ये सहभागी होणाऱ्यांवरती कारवाई केली जाणार असल्याचे महाधिवक्ता डॉ. वीरेंद्र सराफ यांनी कोर्टात सरकारच्यावतीने स्पष्ट केले. तर “सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच निर्देश दिले असून ही आमच्या हस्तक्षेपाची आवश्यकता काय? राज्य सरकारची भूमिका स्पष्ट असताना या प्रकरणांमध्ये कोर्टाला का खेचले जात आहे?” असा सवाल मुख्य न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांना केला. या प्रकरणी आज दुपारी 2:30 निर्णय होण्याची शक्यता आहे.

जागावाटपाची चर्चा ही लांबणीवर

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असून सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीस लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबत बैठक होणार होती. परंतु राज्यातील महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर असल्यामुळे ही चर्चा रद्द करण्यात आली असून 24 तारखेला महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून अन्य कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Rajyasabha Eelection | महायुतीचे दोन नवे खासदार..!; दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड

उद्धव ठाकरेंकडून बंद पाळण्याचे नागरिकांना आवाहन

“ज्या नागरिकांना संवेदनशील मन आहे. त्या प्रत्येक नागरिकाला मी आवाहन करतो. अशा नराधमांना धडा शिकवण्यासाठी अशा विकृत मानसिकतेला आळा घालण्यासाठी त्यांच्या मनात भीती निर्माण करणे गरजेचे आहे. जेणेकरून यापुढे असे कृत्य करण्यासाठी कोणी धजावणार नाही. हा बंद आपण आपल्या माता भगिनींसाठी किती जागृत आहोत हे दाखवणारा असून, यामागे कोणताही राजकीय उद्देश नाही. अशा गुन्हेगारांना ताबडतोब शिक्षा व्हावी, याकरिता हा बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने यामध्ये उत्स्फूर्तपणाने सहभाग घ्यावा. असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आपल्या ऑफिशियल ‘X’ (ट्विटर) अकाउंटवर पोस्ट करत केले.

बंदचा सार्वजनिक दळणवळणावर परिणाम

बदलापुरातील घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांकडून रेल रोको करण्यात आला होता. त्याचबरोबर मागिल आंदोलनामध्ये एसटी महामंडळाच्या बस वरती दगडफेक केली गेली. तेव्हा यावेळी विरोधकांकडून ताकद दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्यातील रेल्वे व बस सेवा यांवर या बंदचा मोठा परिणाम होऊ शकतो.

बंदमुळे बाजारपेठ ही बंद

24 तारखेला होणारा हा बंद राजकीय नसल्याचे महाविकास आघाडी कडून आधी स्पष्ट करण्यात आले असून या बंद दरम्यान अत्यावश्यक सेवांना सोडून इतर सेवा बंद राहणार आहेत. यामध्ये भाजीपाला विक्री, इतर दुकाने, हॉटेल्स, किराणा सामानाची दुकाने, दूध विक्री इत्यादी सेवा बंद असणार आहे.

‘बंदा’संदर्भात वर्षावर पारपडली बैठक

महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये चर्चा झाल्याचे समोर येत आहे. त्याचबरोबर आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here