Maharashtra Politics | सोलापूर येथील माळशिरस तालुक्यातील मारकवाडी येथील बॅलेट पेपर वरील मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली असून प्रशासनाचा दबावामुळे ही मतदान प्रक्रिया थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी याबाबतची घोषणा केली असून “सरकार घाबरले, म्हणून मतदान करू दिले नाही.” असे उत्तम जानकर यांनी म्हटले आहे.
प्रशासनाच्या दबावामुळे मतदान प्रक्रिया थांबवली
मारकवाडी येथील गावकऱ्यांनी आज बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पोलीस प्रशासनाने बॅलेटपेपरवर मतदान करण्यास परवानगी दिली नाही. मतदानासाठी गावकऱ्यांनी मतदान केंद्राबाहेर गर्दी केली होती. परंतु मतदान करण्याकरिता येणाऱ्यांवर गुन्हा दाखल करू असे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून टाकण्यात आलेल्या दबावामुळे ही मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली आहे.
‘सरकार घाबरले आहे’ – उत्तम जानकर
यावेळी उत्तम जानकारी यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला असून त्यांनी, “मारकवाडी गाव दहशतीखाली आहे. एक मत जरी पडले तरी कारवाई करू असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे आम्हीही मतदान प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. ही मतदान प्रक्रिये थांबवली असली तरी देखील आम्ही कायदेशीर मार्गाने जाऊन मोर्चा काढणार आहोत. आता थांबलो तरी आंदोलन करणार. सरकार घाबरले आहे.” असे त्यांनी यावेळी म्हटले.
मतदानाकरिता 5 बूथ तयार करण्यात आले होते
शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांना मारकवाडी गावात आतापर्यंत मताधिक्य मिळत होते. परंतु या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळाल्यामुळे उत्तम जानकर यांनी स्वखर्चाने गावात बेलट पेपर वरती मतदान घेण्याचा निर्णय घेतला. गावामध्ये मतदानाकरिता 5 बूथ तयार करण्यात आले होते. आज सकाळपासून या मतदान प्रक्रियेत सुरुवात झाली परंतु मतदान प्रक्रियेला पोलिसांकडून परवानगी दिली नाही.
Maharashtra Politics | ‘या’ तारखेला होणार नव्या सरकारचा शपथविधी; बावनकुळेंकडून आमदारांना विशेष सुचना
दरम्यान, सध्या मारकवाडी गावामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून जमावबंदीचे आदेश देखील देण्यात आले आहेत. सकाळपासून मतदानासाठी गावकऱ्यांनी यायला सुरुवात केली होती. परंतु जर एकही मतदान झाले तर कारवाई करून व गुन्हे दाखल करू असे पोलिसांकडून गावकऱ्यांना सांगण्यात आले. त्यामुळे दहशतीखाली असलेल्या नागरिकांनी मतदान केले नाही. गावामध्ये प्रशासनाच्या दबावामुळे उत्तम जानकर यांनी मतदान प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम