एअरबस प्रकल्पासाठी वर्षभरापूर्वीच टाटांना पत्र

0
4

द पॉईंट नाऊ: सुमारे २२ हजार कोटींहून अधिक गुंतवणूक असलेला एअरबस प्रकल्प गुजरातला पळविण्याची बाब राज्यातील नागरिकांसाठी चिंताजनक असून, सदरचा प्रकल्प हा नाशिकच्या एचएएल कंपनीत राबविण्यात यावा, अशी मागणी टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्याकडे ऑक्टोबर २०२१ मध्येच आपण पत्राद्वारे केली होती, असा दावा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.

छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (दि. २८ ) माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितले की सप्टेंबर २०२१ रोजी भारत सरकारने देशात गुंतवणुकी करीता एअरबस या कंपनी सोबत २२ हजार कोटी रुपयांचा करार करण्यात आला होता. ह्या विमान बनविणाऱ्या कंपनीचे काम टाटा कंपनीकडे आले. याबाबत लगेचच दि. ३१ ऑक्टोबर २०२१ ला हा प्रकल्प नाशिक मधील ओझर येथे कार्यरत असलेल्या एचएचएल या अनुभवी कंपनीत राबविण्यात यावा, तुम्हांला लागणाऱ्या सर्व सुविधा पुरवू, अशी विनंती आपण रतन टाटा यांच्याकडे पत्राद्वारे केली असल्याचे सांगत हा प्रकल्प महाराष्ट्रामधून गेल्याने दुःख झाल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील तरुणांनी काय फक्त मोर्चे, आरत्या, दहीहंडी आणि फटाके फोडणे इथपर्यंतच मर्यादित राहायचे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्राच्या हिताकरीता दिल्लीत कार्यरत असणाऱ्या नेत्यांनी महाराष्ट्रात जास्तीत जास्त गुंतवणूक कशी येईल, याकरिता प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून दिल्लीत आपलं वजन वापरून यापुढे तरी किमान कुठलाही प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही, तसेच अधिक गुंतवणूक येईल, याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी महाराष्ट्राला लवकरच मोठा प्रकल्प केंद्राकडून गिफ्ट मिळणार असल्याचेही सांगितले. मात्र, एकामागे एक प्रकल्प इतरत्र जात आहेत, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असून, देशाच्या नेत्यांनी केवळ गुजरातचे नेते म्हणून मर्यादित राहू नये, अशी टीकाही भुजबळ यांनी केली.

आंदोलनाची तयारी पूर्ण

नाशिक-मुंबई रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करत अधिकाऱ्यांना तातडीने खड्डे. बुजविण्याच्या सूचना केलेल्या आहेत. रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास १ नोव्हेंबरपासून टोल बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर खड्डे बुजविण्याचे काम सुरु झाले आहे. अद्यापही बरेच काम बाकी आहे. आमचे या कामाकडे बारकाईने लक्ष आहे. आंदोलनाचीदेखील तयारी आमची पूर्ण झालेली आहे, असेही भुजबळ म्हणाले.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here