कळवण शहरात असलेल्या हरी ओम लॉन्सपासून हाकेच्या अंतरावर संदीप पगार यांच्या शेतात कालरोजी सुमारे चाळीस हून अधिक मजुर टोमॅटो काढणीचे काम करत असताना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शेतात लपून बसलेल्या बिबट्याने भिवसन रामदास पवार (शेरी ता.देवळा) या मजुरावर हल्ला करत चावा घेतला.इतर मजुरांनी आरडाओरड करत धाव घेतल्याने बिबट्या पळाला.जखमी झालेल्या भिवसन पवार यास तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता छातीच्या उजव्या बाजूला बिबट्याने चावा घेतल्याने रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आले तर पाठीवरही जखमा झाल्याने प्राथमिक उपचार करून नाशिक जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.
दरम्यान,मजुरांनी शेताचे गेट लावून घेतल्याने हा बिबट्या शेतातच असल्याचे वनविभागाला कळविण्यात आल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी दिपावली गायकवाड सह योगिराज निकम व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता बिबट्या शेतात बसलेला आढळून आला.बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शेतात पिंजरा लावण्यात आला असून या घटनेने शेतकरी आणि शेतमजूरांमध्ये मात्र घबराट पसरली आहे. दरम्यान या ठिकाणी बिबट्यांचा वाढता वावर बघता नागरिकांनी देखील सतर्कता बाळगण्याच आवाहन वन विभागाकडून करण्यात आला आहे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम