नाशिक : शारदीय नवरात्रोत्सवाच्या समाप्तीसाठी अवघे काही दिवस उरले असल्याने ग्रामदैवत श्री कालिकामातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. त्यातच रविवारी तर जत्रेचा आनंद घेण्यासाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती.
मागील दोन वर्षे कोरोना संकटामुळे कालिकामाता जत्रा पार पडली नव्हती. ती यंदा होत असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे. त्यातच रविवारी सप्तमी असल्यामुळे अनेक भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी राज्याचे गृहसचिव आनंद लिमये यांनी सहकुटुंब कालिकामातेचा अभिषेक व महाआरती केली.
तसेच यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात खेळणी व विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लागले असून, तेथेही नाशिककरांची मोठी गर्दी वाढत आहे. पण गुरुवार व शुक्रवारी शहरात जोरदार पाऊस पडल्यामुळे यात्रोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले होते. पण शनिवारी पावसाने उघडीप दिल्यामुळे व वीकएंड असल्यामुळे ह्या दोन दिवशी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. ही गर्दी आणखी काही दिवस राहणार आहे. या यात्रेत विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, तसेच विविध वस्तू व खेळणींच्या विक्रींतून गेल्या सात दिवसांत लाखो रुपयांची उलाढाल झालेली आहे. त्यामुळे शहराच्या अर्थकारणाला काही प्रमाणांत चालना मिळाली आहे.
त्याचसोबत मंदिर परिसरात होत असलेल्या गर्दीमुळे इथे दिवसा वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पण काही बेशिस्त वाहनचालक व परिसरातील पार्किंगच्या जागेवर सोडून इतर भागात केल्या जाणाऱ्या गाड्यांच्या पार्किंगमुळे इथली वाहतूक प्रचंड खोळंबलेली आहेत.
दरम्यान, येथील मंदिरात भाविक सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लावून उभे असतात. त्यामुळे भाविकांची रांग आता दूरवर पोहोचत असल्यामुळे देवीचे त्वरित दर्शन घेता यावे, यासाठी काही भाविक पेड दर्शनाचा लाभ घेत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम