Kajwa Mahotsav | काजवा महोत्सव होणार हाऊस फुल्ल; नेमका काय आहे काजवा महोत्सव..?

0
32
Kajwa Mahotsav
Kajwa Mahotsav

राम शिंदे – प्रतिनिधी : सर्वतीर्थ टाकेद | अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात काजव्यांचा करिष्मा सुरु झाला असुन, भंडारदऱ्याला काजव्यांचे वेध लागले असल्याची जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळे पर्यटकांची पावले आपोआपच भंडारदऱ्याच्या दिशेने सरकु लागली आहेत. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात असणाऱ्या कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात काजव्यांची चमचम सुरु झाली आहे. ही तारकारुपी काजव्यांची चमचम बघण्यासाठी पर्यटकांचे थवे भंडारदऱ्याच्या दिशेने आगेकुच करताना दिसुन येत असुन भंडारदऱ्याच्या टोलनाक्यावर पर्यटकांची रिघ सुरू झाली आहे.(Kajwa Mahotsav)

Kajwa Mahotsav | काय आहे काजवा महोत्सव ?

भंडारदरा धरणाच्या पाणलोटामध्ये असणाऱ्या कळसुबाई हरिश्चंद्रगड अभायारण्यात हिरडा, सादडा, बेहडा, जांभुळ यासारख्या झाडांवर काजवा नावाचा किटक पावसाच्या अगोदर एकाच वेळेस कोट्यावधीच्या संख्येने लयबद्ध चमकताना दिसुन येतात. ही काजव्यांची लयबद्ध चमचम क्षणात वर जाते व दिसेनासी होते. हा अविस्मरणीय क्षण डोळ्यात साठविण्यासाठी पर्यटक भंडारदऱ्याच्या अभयारण्यात गर्दी करतात. काजव्यांचा या चमचमण्याला पर्यटकांनी ‘काजवा महोत्सव’ हे नाव दिले आहे.(Kajwa Mahotsav)

भंडारदऱ्याच्या अभयारण्यात पांजरे, उडदावणे, मुरशेत, रतनवाडी, मुतखेल, कोलटेंभे, मुरशेत तसेच राजुर परिसरातील फोफसंडी, पुरुषवाडी, हरिश्चंद्रगडाचा परिसरात काजव्यांचा हा करिष्मा बघायला मिळतो. पाऊस सुरु होण्याच्या अगोदर काही दिवस काजवे झाडांवर चमकतांना दिसतात. हा काजव्यांचा मिलनाचा कालावधी असुन काजव्यांचे जीवनमान जास्तीत जास्त तीन आठवडे असतो. काजवा त्याच्या शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रियेची सुरुवात व शेवट निश्चित करू शकतो ही सर्व क्रिया त्याच्या प्रकाश अवयवात होते.

काजव्याच्या शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रियेत जेव्हा ऑक्सिजन मिसळतो. तेव्हा प्रकाश तयार होतो व जेव्हा ऑक्सिजन उपलब्ध नसतो. तेव्हा प्रकाश बंद असतो. म्हणून आपल्याला काजवे लुकलुकताना दिसतात. कीटकांच्या शरीरात फुफ्फुस नसते. त्यांच्या शरीरावरच्या त्वचेच्या पातळ थरांमधून ऑक्सिजन आत बाहेर करतो. ग्रीष्म ऋतूला निरोप देताना वर्षाराणीच्या स्वागतासाठी निसर्गदेवताच जणू काजव्यांची ही लक्ष लक्ष प्रकाशफुले मुक्तहस्ते उधळत असतात. नभांगणातील तारांगण जणू भुईवर उतरल्याचा भास होतो.(Kajwa Mahotsav)

तासन-तास पाहत बसले तरी मन तृप्त होत नाही. भंडारदरा धरणाच्या अभयारण्यात यावर्षी प्रचंड उष्णता असल्या कारणाने काजव्यांची म्हणावे असे आगमन झाले नसले. तरी बौद्ध पोर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात काजव्यांची सुरु असलेली चमचम काहीशी कमी वाटते. जसजशी अंधारी रात्र वाढत जाईल तसतशी काजव्यांची चमचम संपुर्ण अभयारण्याला आपल्या प्रकाशाने भुरळ घालेल. तरीसुद्धा एका पावसाची भंडारदऱ्याला काजव्यांच्या बहरण्यासाठी अत्यंत गरज आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here