Jaljeevan Mission | जलजीवन मिशन योजनेतील पाणीपुरवठा विहिरीतून पाण्याची दिवसाढवळ्या चोरी

0
18
Jaljeevan Mission
Jaljeevan Mission

राम शिंदे – प्रतिनिधी : सर्वतीर्थ टाकेद |  इगतपुरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सर्वतीर्थ टाकेद बु. येथे जिल्हा परिषद नाशिक ग्रामीण पाणीपुरवठा मार्फत निविदा काढून सन 2022-23 मध्ये जल जीवन मिशन अंतर्गत ४५,६१,६५२ लक्ष्य निधीची योजना मंजूर झाली योजनेचा कार्यारंभ आदेश ०१/११/२०२२ रोजी जाहीर झाला व योजना पूर्ण करून देण्यासाठी संबंधित मक्तेदार शेळके यांना निविदा जाहीर झाल्यापासून ते ३०/०४/२०२३ पर्यंत मुदत तारीख जाहीर झाली. परंतु काही तांत्रिक कारणास्तव ही योजना रिवायझिंग करण्यात आली त्यानंतर ठेकेदार यांचा अपघात झाल्याने या योजनेच्या कामाला उशिराने सुरुवात केली.

संबंधित योजनेच्या ठेकेदाराने अखेर ही योजना एप्रिल २०२४ मध्ये पूर्ण केली. सदर योजनेची विहीर ही सरपंच यांचे पतीराज व उपसरपंच यांनी कोणत्याही ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता संबंधित ठेकेदाराला विश्वासात घेऊन मालकीच्या गटात पूर्ण केली. यासोबतच बांबळेवाडी येथे जल जीवन मिशन योजना राबविण्यात आली. मात्र सदर विहिरीला देखील सध्या परिस्थितीत पुरेसे पाणी नाही. याअगोदर देखील सदर सार्वजनिक जल जीवन विहिरीतील पाणी संबंधित शेतकरी वापरत होते असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

परंतु, ऐन उन्हाळ्यात सर्वत्र पाणी टंचाई असलेल्या परिसरातील जलजीवन मिशन अंतर्गत राबविलेल्या सदर सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी टाकेद ग्रामस्थांना मे २०२४ मध्ये कुठेतरी प्यायला मिळाले. यापूर्वी टाकेद गावाला दर आठ दहा दिवसांनी राष्ट्रीय पेयजल योजनेच्या पाईपलाईनद्वारे कडवा धरणातील पाणीपुरवठा होत होता. तो पाणीपुरवठा देखील मुबलक नव्हता व सदर पाणीदेखील दूषित गढूळ स्वरूपात सोडले जायचे. यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गावात पाण्याची तीव्र टंचाई जाणवली. जलजीवन मिशन योजना कुठे तरी सफल झाली. परंतु या योजनेचे पाणी टाकेद व घोडेवाडी गावाला दर तीन दिवसांनी मिळत आहे.

एकीकडे सर्वत्र परिसरात दुष्काळाच्या झळा भेडसावत असतांना आणि अनेक ठिकाणी विहिरींनी तळ गाठला अशा परिस्थितीत टाकेद बु. येथील काही दिवसांपूर्वीच पूर्ण झालेल्या व राबविलेल्या जलजीवन मिशन योजनेतील सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीतील पाणी रात्रंदिवस शेजारील शेतकरी गायब करत असल्याचे आरोप केल जात आहे. पावसाळ्याचे दिवस असते तर ती गोष्ट वेगळी होती परंतु ऐन उन्हाळ्यात दुष्काळाच्या झळा जाणवत असतांना एकीकडे लोकांना घोटभर पाण्यासाठी काम धंदा सोडून मोठा संघर्ष करावा लागतो आहे आणि अश्याच परिस्थितीत दिवसाढवळ्या रात्री अपरात्री वाटेल तेव्हा या पाणीपुरवठा विहिरीतील पाण्याचा शेजारील शेतकरी वर्गाकडून उपसा होत असेल तर याला जबाबदार कोण..?, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.

योजनेच्या विहिरीतील पाणी गायब कसे होत आहे..? सार्वजनिक सरकारी विहिरीतील पाणी खाजगी लोकांना घेता येतं का..? यावर सरपंच उपसरपंच स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन गप्प का..? असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. ग्रामपंचायत टाकेद बु. हद्दीतील घोडेवाडी, शिरेवाडी, बांबळेवाडी आदी वाड्यांना दरवर्षी प्रमाणे पिण्याच्या पाण्याची टंचाई याही वर्षी मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. जलजीवन मिशन, राष्ट्रीय पेयजल यांसारख्या योजना राबवूनही बांबळेवाडी ग्रामस्थांना सार्वजनिक पाणीपुरवठा पाईपलाईन नळाद्वारे पाणीपुरवठा होत नाही.

गेल्या अनेक महिन्यांपासून बांबळेवाडी येथील महिला रात्रंदिवस सार्वजनिक टाकीवरून डोक्यावर हंडा घेऊन पाणी वाहत आहे. नळ कनेक्शन हे नुसते नावालाच देखाव्यासाठी केले का..? नळाद्वारे पाणीपुरवठा कधी होणार..? असा सवाल येथील ग्रामस्थांनी केला आहे. यात सरपंच उपसरपंच व संबंधित ठेकेदार यांच्या मनमानी कारभारामुळे जवळपास एक कोटी चार लाख चौरेचाळीस हजार रुपयांची राष्ट्रीय पेयजल योजना फेल गेली असून, या योजनेत शासकीय कार्यारंभ आदेशानुसार तांत्रिक मान्यतेनुसार कोणतेही कामकाज झाले नाही. शासकीय नियमानुसार निकषानुसार काम पूर्ण नाही.

यात स्विच रूम, पर्यायी मोटार किंवा घरोघरी नळ कनेक्शन या सुविधा अपूर्ण आहेत. मुबलक निधी शासनाने पोहचवला. परंतु या निधींचा स्थानिक ग्रामपंचायतीला व्यवस्थित वापर करता आला नाही. कोट्यवधी रुपये खर्चून गावाला वेळेवर पाणी मिळत नसेल. तर, या योजनेचा निधी गेला कुठे….? महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय पेयजल व जलजीवन मिशन योजनांची प्रशासनाने तात्काळ चौकशी करावी व तांत्रिक निकष मान्यतेनुसार सदर योजना पूर्ण आहे की नाही याची पाहणी करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून वेळोवेळी ग्रामसभेत करण्यात आली आहे. मात्र यावर प्रशासनाने डोळेझाकच केली.

तरी अपयशी ठरलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेची संबंधित प्रशासनाने चौकशी करावी व जलजीवन मिशनच्या सार्वजनिक विहिरीतील पाणी अवैधरित्या उपसा करणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करत ग्रामपंचायत टाकेद बु हद्दीतील बांबळेवाडी,घोडेवाडी, शिरेवाडी सह स्थानिकांचा पाणी प्रश्न सोडवावा. यासोबतच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा मार्फत राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय पेयजल, जलजीवन मिशन या योजनांची प्रशासनाने तात्काळ चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी.

तसेच तिनही वाड्यांसह टाकेद गावाला सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा. अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वरिष्ठ पातळीवर आंदोलन करण्यात येईल महिलांच्या वतीने हंडा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते योगेश घोरपडे, नितीन मडके, विजय बांबळे यांनी दिला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here