द पॉईंट नाऊ: नवरात्रोत्सवामुळे फुलांची वाढलेली मागणी, जोरदार पावसामुळे फुलशेतीचे झालेले नुकसान आणि त्यामुळे फुलांची घटलेली आवक आदी कारणांमुळे फुलबाजारात सध्या मोठी तेजी आली आहे. नवरात्रोत्सवापूर्वी असलेले फुलांचे दर सध्या दुप्पट ते तिपटीने वाढले आहेत.
दरवर्षी गणपती उत्सव, नवरात्री आणि विजया दशमीनिमित्त फुल बाजाराला बहर येतो. अनेक शेतकरी या सणांच्या पार्श्वभूमीवर फुलशेतीचे नियोजन करत असतात. मात्र, कधी- कधी फुलांची आवक वाढून दर कोसळतात. यंदा मात्र, आवक घटल्याने सर्वच फुलांचे दर तेजीत आहे. जोरदार परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील फुलशेतीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे फुलांची गुणवत्तादेखील घसरली. परिणामी, नाशिकच्या बाजारात देखील फुलांची आवक घटली आहे. नवरात्रोत्सवापूर्वी १५० रुपये प्रतिकॅरेट असलेल्या झेंडूच्या फुलांना २५० रुपये दर मिळत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. याशिवाय शेवंती, मोगरा, अष्टर, निशिगंध अशा सर्वच फुलांचे दर जवळपास दुपटीहून अधिक महागले आहे. विजयादशमीमुळे यात आणखी वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे.
झेंडूसह, मोगरा, शेवंतीचे नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतले जाते. याशिवाय डहाणू आणि बँगलोर येथून मोगरा व लिली नाशिकच्या बाजारात दाखल होते निशिगंध पुणे परिसरातून मागवली जातात. पावसामुळे घटलेले उत्पन्न आणि वाहतूक खर्च यामुळे बाजारात सध्या तेजी दिसून येत आहे.
जिल्ह्यात आठ- दहा दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे फुलशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या रिमझिममुळे पाने, फुले खराब होऊन उत्पादन घटले आहे. तर नवरात्रोत्सवामुळे फुलांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे, त्यातच विजयादशमीचा सण अवघ्या तीन दिवसांवर असल्याने मागणी वाढत असून तेजी कायम राहणार आहे.
– संदीप शिंदे, अध्यक्ष, फूलबाजार असोसिएशन
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम