Skip to content

शेतकऱ्यांचे जीवन ठरतेय शाप…!


शब्दांकन : पंकज केवारे
आज 120 करोड पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशात, कुणीही उपाशी पोटी झोपू नये, प्रत्येकाची दोन वेळच्या जेवणाची भूक भागावी म्हणून हा बळीराजा अहोरात्र झटत असतो. तेव्हा शेतकरी सर्वांसाठी एक वरदान असतो. पण ह्या निसर्गाच्या विकोपामुळे परतीचा पाऊस थैमान घालतो तेव्हा शेतकरी संकटात येतो आणि मात्र त्याचे जीवन मग एक शाप वाटू लागते.

दिवस-रात्र काबाडकष्ट करून पिकविलेले सोयाबीन, भात, कापूस ऐन कापणीच्या वेळी परतीच्या पावसामुळे सर्व पीकं मातीमोल झाली आहेत, तसेच भाजीपाला, कांदे, केळी या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मुख्य पिकात पूर्णतः पाणी साचून संपूर्ण पिकाची नासाडी झाली आहे, शेतकऱ्याच्या तोंडी आलेला घास आज ह्या निसर्गाने हेरावून घेतला आहे, ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतीची नुकसान झाल्याने महाराष्ट्रात असे हजारो घर आहेत की जिथे दिवाळीच साजरी झाली नाही आणि महत्त्वाचं म्हणजे अशा कित्येक कुटुंबांतील लहान लेकरं सुद्धा ह्या आनंदाच्या क्षणापासून वंचित आहेत, ही स्थिती खूप विदारक आहे, परतीच्या पावसाने मुख्यतः मराठवाडा, विदर्भ, नगर, नाशिक व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात खूप मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान केले आहे.

शेतीची ही मोठ्या प्रमाणावर झालेली नुकसान जिव्हारी लागल्याने राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे, त्यात मुख्यतः विदर्भातील भंडारा, यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यात मागील तीन दिवसात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठवाड्यात, परभणीतले दोन, बीडमध्ये एक तर नांदेडमध्ये एक अशा चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, हे वास्तव खूप गंभीर आहे. या भागातील अनेक कुटुंब आज मुख्य व्यक्तीच्या आधाराविना उघड्यावर आहेत, तर लहान लेकरांनी आपल्या वडिलांना गमावले आहे ही अवस्था अत्यंत दयनीय आहे. आज हा बळीराजा डोळ्यात पाणी आणून रडतोय, याकडे सरकारने, स्थानिक – लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणं महत्त्वाचं आहे,
लवकरात – लवकर ओला दुष्काळ जाहीर करून, नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करावे व शेतकऱ्यांना मदत मिळावी ही मागणी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आहे.

परतीच्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे, त्यात मुख्यतः पिकाबरोबर शेताचेही मोठे नुकसान झाले आहे, ही बाब शेतकऱ्यांसाठी खूप दुःखाची आहे, त्यामुळे सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी ही संपूर्ण शेतकऱ्यांची मागणी आहे.
– कृषीमित्र, पंकज नितीन केवारे
मायदरा,ता.ईगतपुरी जि.नाशिक
(लेखक शरद कृषी महाविद्यालय, जैनापुर येथे कृषी शिक्षण घेत आहेत)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!