Trambkeshwar : ब्रम्हगिरी चलो संत बनके, रोपवे हटाव हनुमान बनके…खासदार लठ्ठ, आमदार लठ्ठ, नको रोपवेचा हट्ट….अश्या विविध घोषणांनी काल ब्रह्मगिरी परिसर दणाणून निघाला होता. फलक हातात घेऊन अनेक पर्यावरण प्रेमी ब्रम्हगिरी पर्वतावर पोहोचले… गेल्या काही दिवसांपासून अंजनेरी ब्रह्मगिरी दरम्यान रोपवे करण्याचा घाट घालण्यात आला आहे. या कामासाठी काही दिवसांपासून निविदा प्रक्रिया देखील राबवण्यात येत आहे. मात्र हा रोपवे झाला तर ब्रह्मगिरी व अंजनेरी पर्वताला मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल आणि या पर्वतांच्या दरम्यान असलेलं गिधाडांच साम्राज्य नामशेष होईल यामुळे अनेक पर्यावरण प्रेमींकडून या रोपवेला विरोध केला जात आहे. हाच विरोध दर्शवण्यासाठी रोपवे थांबवा जटायू वाचवा… ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. यावेळी पर्यावरण प्रेमी संघटनांच्या माध्यमातून ब्रह्मगिरी ला जाणाऱ्या पायऱ्यांवर जटायु पूजन करत अंजनेरीसह ब्रह्मगिरी साठी देखील हा रोपवे धोकादायक असल्याचं मत व्यक्त करण्यात आल आहे.
ब्राम्हगिरीला का म्हणतात गिधाडांच घर
एकीकडे त्र्यंबकेश्वरला बारा ज्योतिर्लिंगांपैकी एका ज्योतिर्लिंगाचा मान प्राप्त आहे. दुसरीकडे नाशिकला कुंभनगरी म्हणून देखील ओळखलं जातं तर नाशिकच्या पंचवटीमध्ये श्री प्रभू रामचंद्रांनी वनवासा दरम्यान काही दिवस घालवले असल्याचा उल्लेख रामायणामध्ये आढळून येतो. याचवेळी जेव्हा रावण सीतेचे हरण करत होता तेव्हा ज्या जटायू पक्षाने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तो पक्षी गिधाड होता असं बोललं जातं. आणि या गिधाडांचं घर म्हणून अंजनेरी ब्रह्मगिरी पर्वतरांग ओळखली जाते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गिधाडांचं प्रजनन होत असतं. आधुनिकीकरणामुळे आधीच या ठिकाणी गिधाडांच्या संख्येमध्ये लक्षणीय प्रमाणात घट झाली आहे. यातच आता नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली ही प्रजाती या रोपवेमुळे संपुष्टात येईल अशी भीती पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड, नैसर्गिक साधन संपत्तीला तडा देऊन हे प्रकल्प राबवले जात असल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे. यामुळे हा रोपवे केल्यास या ठिकाणी मानवी हस्तक्षेप वाढल्याने गिधाडांचं साम्राज्य नष्ट होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे अंजनेरी हा पर्वत जैवविविधतेने नटलेला आहे. या ठिकाणी अनेक वन्यजीव आणि औषधी वनस्पती आढळून येतात. जगभरात या दुर्मिळ वनस्पती एकमेव ठिकाण म्हणून अंजनेरीला ओळखले जाते. मात्र या रोपवेच्या कामामुळे या ठिकाणच्या वन्यजीवांचा अधिवास धोक्यात येईल तसेच या औषधी वनस्पती देखील नामशेष होतील. यामुळे पर्यावरण प्रेमींनी एकत्र येऊन ब्रह्मगिरीच्या पायऱ्यांवर जटायुपूजन केलं आणि या रोपवेला आपला कायमच विरोध राहणार असल्याचे स्पष्ट केल आहे. यामुळे यावर पुनर्विचार व्हावा अशी देखील मागणी त्यांनी केली असून रोपवे होऊ नये म्हणून आपला लढा असाच सुरू राहील असं देखील सांगण्यात आलं आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम