नाशिक शहर परिसरात वीस दिवसांत आठवी घटना; अंबड येथे तरुणाची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या

0
15

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (नाशिक) : नाशिक शहरात पुन्हा एक हत्येची घटना घडली आहे. मागील 20 दिवसांत नाशिक शहरात ही आठवी हत्येची घटना आहे. यामुळे नाशिक शहरातील गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही का, असा सवाल संतप्त नागरिक करत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, अंबड परिसरातील किर्लोस्कर कंपनीजवळ हा प्रकार घडला आहे. नंदकुमार आहेर असे मृत तरुणाचे नाव असून, ते एका खाजगी कंपनीत प्रोडक्शन मॅनेजर या पदावर कार्यरत होते.

अंबड औद्योगिक वसाहतीतील एका इंजिनिअरिंग कंपनीच्या गेटजवळ नंदकुमार आहेर यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी वार करत ते पसार झाले. आहेर यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रक्तस्राव अधिक झालेला असल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नाशिक शहर आणि परिसरात वाढत्या गुन्हेगारीने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील 20 दिवसांत ही हत्येची आठवी घटना असल्याने, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नाशिक शहर पोलीस प्रशासनासमोर सलग घडलेल्या या हत्येच्या घटनांमुळे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून तलवार आणि चाकू अशी हत्यारे जप्त केली असून, एका संशयितास अटक केली आहे. ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली याचा पोलीस तपास करत असून, इतर तिघा संशयितांचा शोध घेतला जात आहे.

नाशिक शहरात नुकतेच पोलीस प्रशासनाद्वारे विशेष मोहीम राबविण्यात येऊन बराच शस्त्रसाठा, तडीपार आणि फरार असलेल्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे पोलीस पथकाच्या कार्याचे विशेष कौतुक केले गेले होते. मात्र यादरम्यानच्या काळात घडलेल्या आणि सुरू असलेल्या या हत्यासत्राने मात्र पोलीस प्रशासनाची झोप उडवली आहे.

नाशिक शहरात सलग हत्येच्या घटनांनी पोलीस प्रशासनासमोर मोठा गहन प्रश्न उभा केला आहे. घडलेल्या या सलग हत्येच्या घटनांनी नागरिक मात्र पुरते भयग्रस्त झाले आहेत. यामुळे नाशिक शहर आणि परिसरात फोफावलेल्या आणि वाढत चाललेल्या या घटनांना आळा कधी बसणार? नागरिकांना सुरक्षित कधी वाटणार आणि मोकळा श्वास कधी घेता येणार? असे प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. या घटनांनी नागरिकांचे घराबाहेर पडणे देखील अवघड केले असल्याच्या भावना नागरिक व्यक्त करू लागले आहेत. आता पोलीस प्रशासन काय ठोस पाऊल उचलते? याकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here