Dr. Rahul Aaher | देवळा-चांदवड विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होत असून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली. मतदारसंघात अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरत डॉ. राहुल आहेर यांचे चुलत बंधू केदा आहेर यांनी आव्हान उभे केले आहे. दरम्यान, याविषयी आता राहुल आहेरांनी मौन सोडले असून केदा आहेरांकडून करण्यात आलेल्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नसल्याचे सांगत. आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याविषयी खुलासा केला आहे.
स्वतःचा बाप जितके अधिकार मुलाला देत नाही इतके अधिकार दिले
उमेदवारीतून डावदल्या नंतर केदा आहेर यांच्याकडून राहुल आहेरांवर आरोप करण्यात आले होते. याविषयी बोलताना त्यांनी, “स्वतःचा बाप जितके अधिकार मुलाला देत नाही, एखादा पती आपल्या पत्नीला जितके अधिकार देऊ शकत नाही. त्याच्या पलीकडे मी सर्व अधिकार त्यांना दिले. मग ते नाफेड असो, नाशिक जिल्हा बँकेचे अध्यक्ष पद किंवा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष पद असो, खरा अन्याय तर माझ्यावरच झाला आहे.” असे म्हणत त्यांनी केदा आहेरांचे आरोप धुडकावले.
दोन महिन्यांपासून त्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नात होतो…
तसेच ‘माघार घेतल्याचे सांगत गाफील ठेवण्याचे काम केले’ असा आरोपही केदा आहेर यांच्याकडून करण्यात आला होता. याविषयी बोलताना, “हा गेम प्लॅन नव्हता. असे करून मला काय फायदा झाला असता? कोणाला गाफील ठेवले नाही. हे जर ठरवून केले असते तर नुकसान माझेच झाले असते. मी दोन महिन्यांपासून त्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नात होतो. पत्रकार परिषद घेऊन मी माझी भूमिका ही मांडली. परंतु केंद्रीय समितीनेच नाव फायनल केल्याने त्यात कोणीच बदल करू शकत नसल्याने उमेदवारी करावी लागेल. असे म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी दोघांचीही समजूत काढली होती.” असा खुलासा त्यांच्याकडून करण्यात आला.
विकासकामांच्या जोरावर मतं मागत आहे…
त्याचबरोबर त्यावेळी त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर भाष्य करत अनेक वर्षांपासून प्रलंबित नारपार नदीजोड प्रकल्पास मिळालेली मंजुरी, चांदवड-मनमाड काँक्रीट रस्ता कॉंक्रिटीकरण, देवळा-मंगळूर रस्ता, चांदवड-देवळा तालुक्यातील बंधारे निर्मिती, कांदा अनुदान तसेच 4000 कोटींच्या विकास कामांच्या जोरावर तिसऱ्यांदा निवडणूक लढवत असल्याचे सांगितले. तसेच “घरातून जरी आव्हान असले तरी, निवडणूक निवडणुकीसारखीच लढावी लागत आहे. ही निवडणूक सर्व ताकदीनिशी लढत असून कौटुंबिक वाद बाजूला ठेवत केलेल्या विकासकामांच्या जोरावर मतं मागत आहे.” असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम