नाशिक : पंचवटीतील आडगाव परिसरात नवरात्रीच्या अखेरच्या दिवशी दुखद घटना घडली. येथील दांडियाचा उत्सवात एका डीजे ऑपरेटरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
पप्पु अरुण बेंडकुळे (३५, रा. आडगाव) असे या मृत्यु झालेल्या डीजे ऑपरेटरचे नाव आहे. मयत बेंडकुळे व त्याचा मित्रांचा साऊंड सिस्टिम पुरविण्याचा व्यवसाय होता. आडगाव परिसरातील मेडिकल फाटा परिसरातील जय जनार्दन फाउंडेशनच्या वतीने दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले होते. त्या दांडिया महोत्सवासाठी बेंडकुळेने मंडळाला साऊंड सिस्टिम पुरवले होते.
दरम्यान, मंगळवारी (दि. ४) रात्री अकराच्या सुमारास पप्पू हा साउंड सिस्टिम असलेल्या चारचाकी वाहनात लोखंडी शिडीच्या सहाय्याने चढत असताना शिडीत विजेचा प्रवाह उतरला व त्याला विजेचा जोरदार शॉक बसल्याने तो शिडीवरून खाली कोसळला. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यास त्वरित जिल्हा रुग्णालयात नेले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त हाेत अहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रियाझ शेख व त्यांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी पुढील तपास सुरु असून आडगाव पोलीस ठाण्यात त्याच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शिडीतील विजेचा प्रवाह उतरल्याने ही दुर्घटना
दरम्यान, सदर मंडळाने वीज वितरण कंपनीकडून तात्पुरत्या स्वरुपात रीतसर वीज कनेक्शन घेतलेले होते. ज्यावेळी चारचाकीतील साऊंड सिस्टिमला इलेक्ट्रिक वायरिंग केली, त्या चारचाकीच्या शिडीला विजेचा प्रवाह उतरल्यामुळे सदरची दूर्घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज यावेळी व्यक्त केला जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम